Uddhav Thackeray : BMC निवडणुकीच्या उंबरठ्यावर ठाकरे कुटुंबाला ‘मोठं पद’, सरकारच्या निर्णयाने चर्चांना उधाण...
- Reported by:UDAY JADHAV
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray : राज्य सरकारने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगर परिषद निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर, महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरू झाले आहे. मुंबई महापालिकेची महत्त्वाची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेतून ठाकरे गटाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मोठी घडामोड झाली आहे. राज्य सरकारने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने शासननिर्णय काढत ही नियुक्ती अधिकृत केली. या निर्णयानुसार, उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही स्थान देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीत उभारण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्मारकाची कामे वेगात सुरू असून, नव्या नियुक्त्यांमुळे प्रकल्पाला अधिक दिशा आणि गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील वर्षभरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
उद्धव यांना हटवण्याची केली होती मागणी...
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे, असेही कदम यांनी म्हटले होते.ो
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 16, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : BMC निवडणुकीच्या उंबरठ्यावर ठाकरे कुटुंबाला ‘मोठं पद’, सरकारच्या निर्णयाने चर्चांना उधाण...









