Uddhav Thackeray Eknath Shinde: दिल्लीत डिनर अन् राज्यात खळबळ! ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिलेदाराच्या घरी, नेमकं चाललंय तरी काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. तर, दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाच्या खासदाराच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली.
मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे काही घडामोडींनी चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. तर, दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाच्या खासदाराच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण आले असतानाच, दिल्लीत घडलेल्या एका घटनेने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या 'डिनर डिप्लोमसी'ला शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या खासदारांनी उपस्थिती लावल्याने तर्कवितर्कांना वेग आला आहे.
कोण होते ते खासदार?
ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावली. राज्यातील सत्तासंघर्ष आणि दोन्ही गटांमधील तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या घरी जाणे ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
advertisement
आष्टीकर काय म्हणाले?
या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना खासदार नागेश आष्टीकर यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. "प्रतापराव जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस (Anniversary) होता. त्यांनी सभागृहात आम्हाला आग्रहाचे निमंत्रण दिले होते, म्हणून आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो," असे स्पष्टीकरण आष्टीकर यांनी दिले. तसेच, "५-१० मिनिटांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आम्ही एकाच सभागृहाचे सदस्य आहोत, त्यामुळे सुख-दुःखात एकमेकांना भेटणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
advertisement
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना हवा
आष्टीकर यांनी जरी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले असले, तरी राजकीय वर्तुळात मात्र याला 'डिनर डिप्लोमसी' म्हणून पाहिले जात आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमध्ये या भेटीमुळे मिठाचा खडा पडला असून, ठाकरे गटात काही 'अलबेल' आहे की नाही, यावर आता खल सुरू झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Eknath Shinde: दिल्लीत डिनर अन् राज्यात खळबळ! ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिलेदाराच्या घरी, नेमकं चाललंय तरी काय?









