भावंडांनी उभारलं 5 स्टार कृषी पर्यटन केंद्र! आज विदेशातून लोक येतात बघायला
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
पर्यटकांना ग्रामीण पद्धतीचा अनुभव घ्यायचा असतो. परंतु शहरी जीवनशैलीची सवय असल्यामुळे काही बाबतीत तडजोड करता येत नाही. म्हणूनच सर्व पंचतारांकित सोयीसुविधा असलेलं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : अभ्यासपूर्ण शेती केल्यास उत्तम उत्पन्न मिळतं हे आता अनेक तरुण शेतकरी दाखवून देत आहेत. कोल्हापुरातील काही भावंडांनी तर एका छोट्याशा गावात खडकाळ माळरानावर पंचतारांकित सोयी सुविधा असलेलं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. 3 भाऊ आणि 2 बहिणींनी लहानपणापासूनच केलेल्या प्रयत्नांतून हे शक्य झालं. त्यांना आपल्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली.
advertisement
कोल्हापूर जिल्हा ऊसासाठी विशेष ओळखला जातो. इथं अनेक कृषी पर्यटन केंद्र आहेत. पन्हाळा तालुक्यातील माले गावात शशिकांत, रमाकांत, कै. श्रीकांत हे चौगुले बंधू आणि संगीता भोसले, अर्चना पाटील या शेतकरी भाऊ-बहिणींनी मिळून स्वतःचं अद्ययावत असं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. वर्षभरातच इथं पर्यटक दाखल होऊ लागले. अगदी राजकीय नेत्यांसह व्यावसायिक आणि सेलिब्रिटी इथं भेट देतात.
advertisement
कशी झाली सुरूवात?
रघुनाथ चौगुले हे माले गावचे पर्यावरणप्रेमी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या 12 एकर शेतात 6 एकर जागेत ऊस आणि एका एकरात सोयाबीन आहे. शासनाच्या 'झाडे लावा, झाडे जगवा' उपक्रमातून 2002 साली पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 200 झाडं लावली. परंतु उन्हाळ्यात मात्र ती सुकू लागली. मग रघुनाथ यांच्या लहान मुलांनी 1 ते दीड किलोमीटर अंतरावरून घागरीनं, कावडीनं पाणी आणून या झाडांना दिलं. तब्बल 7 वर्षे मुलांनी हे काम केलं. मग मात्र झाडं जोमात वाढू लागली आणि मुलांची पर्यावरणाशी जवळीकही वाढली. कोरोना काळात आपल्या शेतातल्या घरात राहत असताना निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानं किती मनःशांती मिळते हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर चौगुले भावंडांनी अद्ययावत सोयी सुविधांचं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. शशिकांत चौगुले यांनी ही माहिती दिली.
advertisement
पंचतारांकित सोयींनी युक्त पर्यटन केंद्र!
कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पर्यटकांना ग्रामीण पद्धतीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घ्यायचा असतो. परंतु शहरी जीवनशैलीची सवय असल्यामुळे काही बाबतीत तडजोड करता येत नाही. म्हणूनच सर्व पंचतारांकित सोयीसुविधा असलेलं कृषी पर्यटन केंद्र चौगुले भावंडांनी सुरू केलं. त्यांनी 'आठवण मातीची' या इको रिसॉर्टमध्ये फाइव्ह स्टार हॉटेलमधील सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आजूबाजूला कोणताही धबधबा, थंड हवेचं ठिकाण किंवा तलाव नसताना त्यांनी फोंड्या माळरानावर हे पर्यटन केंद्र सुरू केलं आहे.
advertisement
एकही झाड न तोडता बांधकाम!
हे कृषी पर्यटन केंद्र उभारताना त्यांनी लावलेल्या केसर आंब्याच्या दीडशे ते दोनशे, चिकूच्या दीडशे आणि आजूबाजूच्या झाडांची विशेष काळजी घेतली. त्यांनी एकाही झाडाच्या एकाही फांदीला धक्का लागू दिला नाही. पूर्ण कृषी पर्यटन केंद्र लाकूड, बांबू, कोकणातील जांभा दगड, पाइनवूड, इत्यादींचा वापर करून बांधलं. त्यासाठी आसामहून कारागीर बोलावले होते, असं रमाकांत यांनी सांगितलं.
advertisement
भाऊ-बहिणींचा एकत्र व्यवसाय!
आजकाल भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठे वाद होतात. एकत्र व्यवसाय करायचा म्हटलं तर पुढे वाद होतील की काय अशी भीतीच वाटते. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असतं. परंतु चौगुले भावंड आजच्या काळातही एकत्र व्यवसाय उत्तमरीत्या करत आहेत हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची कल्पना रमाकांत आणि शशिकांत यांना त्यांच्या 2 बहिणी आणि दाजींनी दिली होती.
advertisement
पन्हाळ्यापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर माले गावाजवळ फोंड्या माळावर हे केंद्र असून चौगुले कुटुंबियांनी फुलवलेली 200 हून अधिक झाडं शुद्ध हवा देतात. इथं येणाऱ्या पर्यटकांचं मन या हिरवळीमुळे प्रसन्न होतं. शहरी धावपळीत व्यस्त असलेल्या कित्येक पर्यटकांना हे कृषी पर्यटन केंद्र आकर्षित करतं. सामान्य नागरिकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणाला भेट देतात आणि शेतकऱ्यांच्या यशस्वी प्रयत्नांचं कौतुक करतात. विशेष म्हणजे विदेशातील पर्यटकही इथं दाखल होतात, असं शशिकांत यांनी सांगितलं. दरम्यान, कृषी व्यवसायांमधून उत्तम उत्पन्न मिळवता येतं हेदेखील या भावंडांनी दाखवून दिलं आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 16, 2024 10:40 AM IST