आई गेली पण लोकांना शुद्ध हवा मिळाली! लेकरांनी लावली तब्बल 1000 झाडं
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
विशेष म्हणजे आता दरवर्षी अशाप्रकारे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आई आपल्यातून जाऊन वर्ष झालं. तिच्या आठवणीत दरवर्षी कमीत कमी हजार झाडांची लागवड करायची, असा संकल्प आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : आपण आईशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही, जर दुर्दैवानं तशी वेळ आलीच, तर जन्मोजन्मी आईच्या आठवणी, तिचा सहवास आपल्या मनातून जाणं शक्य नाही. आईचं पुण्यस्मरण म्हणून एका नव्या जीवाला जन्म देणं, त्याला वाढवणं यापेक्षा दुसरं पुण्याचं काम कोणतंच नसेल. मग हा जीव एखादं रोपटं का असेना. ते मोठं झाल्यावर किमान 4 जणांना सावली देऊ शकेल आणि शेकडो जणांना ऑक्सिजन देईल. जोपर्यंत हे झाड जगेल, तोपर्यंत आपली आई लोकांच्याही स्मरणात राहील, हाच व्यापक विचार करून सातारा जिल्ह्यातील काळोखे कुटुंबियांनी आईच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यानिमित्त 1000 झाडांचं वाटप करून त्यांची लागवड करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवला.
advertisement
सातारच्या वाठार स्टेशन इथं हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे आता दरवर्षी अशाप्रकारे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आई आपल्यातून जाऊन वर्ष झालं. तिच्या आठवणीत दरवर्षी कमीत कमी हजार झाडांची लागवड करायची, असा संकल्प काळोखे कुटुंबियांनी केला आहे. त्यांना गावकरी आणि गावातील विद्यार्थ्यांची साथ मिळाली.
advertisement
गावातील मोकळ्या भागात आंबा, चिकू, फणस, वड, पिंपळ, चिंच, इत्यादी विविध प्रकारच्या हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. वाढतं प्रदूषण लक्षात घेता नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, या विचारातून आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेनंदेखील या उपक्रमात पुढाकार घेतला. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. जर आजूबाजूला मोठ्या संख्येनं झाडं असतील तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या खिडकीत, अंगणात, परिसरात वृक्षलागवड करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 16, 2024 9:36 AM IST