सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये मोठा धमाका, इतिहासात पहिल्यांदाच घडलं, चांदीनं आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चांदीने MCX वर 3,06,000 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. चीनमधील मागणी, सोलर पॅनेल आणि EV उद्योगामुळे दरवाढ; गुंतवणूकदारांना फायदा, ग्राहकांना झटका.
कल्पना करा, गेल्या महिन्यात तुम्ही एखादी वस्तू पाहिली असेल आज ती घ्यायला गेल्यावर दुकानदार तर त्याची किंमत पाहून नक्कीच धक्का बसेल! सोन्या चांदीने अगदी शेअर मार्केटपासून ते सराफ मार्केटपर्यंत भूकंप आणला आहे. चांदीच्या बाजारपेठेत अक्षरश: खळबळ उडाली आहे. जे आजवर ११० वर्षांत कधी घडलं नव्हतं ते आता घडलंय.
आज चांदीने भारतीय सराफा बाजाराच्या इतिहासात असा काही धमाका केलाय, ज्याने जुने सर्व रेकॉर्ड कचऱ्याच्या पेटीत फेकले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीने पहिल्यांदाच 3,06,000 रुपये प्रति किलोचा डोंगर सर केला आहे. ही केवळ दरवाढ नाही, तर सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला सर्वात मोठा झटका आहे.
गेल्या अनेक दशकांपासून सोन्याच्या मागे धावणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष आता चांदीने पूर्णपणे वेधून घेतले आहे. १९ जानेवारी २०२६ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या भावाने पहिल्यांदाच इतका मोठा टप्पा गाठला आहे. सध्या बाजार उघडताच चांदीचा भाव 3,06,000 रुपये प्रति किलोच्या आसपास स्थिरावला असून, या दरवाढीने संपूर्ण देशातील सराफा बाजार आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
केवळ एका वर्षात दरांचा रॉकेट प्रवास
चांदीच्या किमतीचा गेल्या एक वर्षातील आलेख पाहिला तर तो थक्क करणारा आहे. वर्षभरापूर्वी जी चांदी 1 लाख रुपये किलो होती, ती सहा-आठ महिन्यांत 2 लाखांवर पोहोचली आणि आता तिने 3 लाखांचा टप्पा गाठला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 30 दिवसांमध्ये चांदी 1 लाख रुपयांनी वाढली आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव 2,03,500 रुपये होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात चांदी 1 लाख रुपयांनी महाग झाली.
advertisement
चांदीच्या या महास्फोटामागे दडलंय चीन कनेक्शन
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या या बेफाम दरवाढीमागे चीनचा मोठा हात आहे. चीनमध्ये सध्या चांदी जागतिक बाजारपेठेपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे. याचा अर्थ असा की, चीनमध्ये चांदीचा पुरवठा कमी पडत असून मागणी प्रचंड वाढली आहे. जेव्हा चीनसारख्या मोठ्या बाजारपेठेत मागणी वाढते, तेव्हा त्याचे पडसाद लंडन आणि न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय बाजारात उमटतात आणि तिथूनच भारतासारख्या देशात किमती गगनाला भिडतात.
advertisement
सोलर पॅनेल आणि ईव्ही उद्योगाचा प्रभाव
चीन हा जगातील सर्वात मोठा सोलर पॅनेल उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. सध्या जगभरात 'ग्रीन एनर्जी'वर भर दिला जात असल्याने सोलर पॅनेलची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्येक सोलर पॅनेलच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर अनिवार्य असतो. तसेच इलेक्ट्रीक वाहनांच्या (EV) बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्येही चांदी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या औद्योगिक मागणीमुळे चांदी आता केवळ एक दागिना राहिली नसून ती उद्योगांसाठी एक मौल्यवान कच्चा माल बनली आहे.
advertisement
अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष
रशिया-युक्रेन नंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम देखील जागतिक बाजारपेठांवर दिसून आला आहे. सोन्या चांदीच्या दरांवरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बऱ्याच गोष्टी घडत असल्याने त्याचे पडसाद देखील यावर पडत आहेत.
गुंतवणूकदारांची चांदी; ग्राहकांची मात्र कोंडी
गेल्या तीन महिन्यांत ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना सोन्याच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त परतावा मिळाला आहे. मात्र, याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. लग्नसोहळ्यांसाठी लागणारी चांदीची भांडी, दागिने किंवा देवघरातील वस्तू खरेदी करणे आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. फिजिकल चांदीची मागणी कमी झाली असली तरी, 'डिजिटल सिल्व्हर' आणि 'चांदी ईटीएफ' (ETF) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे.
advertisement
आता गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल का?
सर्वसामान्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की, चांदी ३ लाखांच्या वर गेली असताना आता गुंतवणूक करावी का? यावर बाजार तज्ज्ञांचे मत असे आहे की, ज्यांना 'शॉर्ट टर्म' किंवा महिनाभरासाठी पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा दर थोडा जोखमीचा असू शकतो, कारण बाजारात कधीही मोठी 'प्रॉफिट बुकिंग' होऊन दर थोडे खाली येऊ शकतात. मात्र, ज्यांचा दृष्टिकोन ३ ते ५ वर्षांचा आहे, त्यांनी प्रत्येक घसरणीवर थोड्या-थोड्या प्रमाणात चांदी खरेदी करणे फायद्याचे ठरेल. जागतिक अस्थिरता आणि वाढती औद्योगिक गरज पाहता, चांदी येणाऱ्या काळात आणखी नवनवीन उच्चांक गाठू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही तज्ज्ञांची माहिती आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 6:58 AM IST
मराठी बातम्या/मनी/
सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये मोठा धमाका, इतिहासात पहिल्यांदाच घडलं, चांदीनं आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड










