बँकेच्या टार्गेटला वैतागून नोकरी सोडली, एक-दोन करत 50 कोंबड्या जमवल्या, आता कितीची कमाई?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Poultry Farming: खासगी बँकेचं टार्गेट पूर्ण करत बसण्यापेक्षा जालन्याच्या तरुणाने स्वत:चं टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता कुक्कुटपालनातून तो महिन्याला लाखांची कमाई करतोय.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: तब्बल सात वर्षे एका खाजगी बँकेमध्ये नोकरी केल्यानंतर जालन्यातील एका तरुणाने गावरान कोंबड्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून हा तरुण महिन्याकाठी तब्बल एक लाख रुपये उत्पन्न कमावत आहे. केवळ 50 गावरान कोंबड्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 1 हजार पक्ष्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर स्वतःची हॅचरी असल्याने पिल्ले विक्रीतून देखील त्याची मोठी कमाई होतेय. विशाल लांडगे असं या तरुणाचं नाव असून तो जालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी गावचा रहिवासी आहे.
advertisement
जामवाडी येथील सर्वसाधारण कुटुंबातील विशाल कचरू लांडगे या तरुणाचं पदवीपर्यंत शिक्षण झालं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने शहरातील एका खाजगी बँकेमध्ये तब्बल सात वर्ष नोकरी केली. परंतु, नोकरी करत असताना त्याला समाधान मिळत नव्हते. बँकेचे टार्गेट किती दिवस पूर्ण करायचं? त्यापेक्षा आपण आपलंच टार्गेट पूर्ण करूयात, असं म्हणत त्याने स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा या दृष्टीने विचार सुरू केला. कुक्कुटपालन हा व्यवसाय या आधी देखील केला असल्याने त्याने या व्यवसायाची निवड केली. सुरुवातीला गाव वस्तीवरून 10-12 अशा शुद्ध गावरान कोंबड्या जमा करून 50 कोंबड्यांपासून या व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
व्यवसायात नवीन असल्याने सुरुवातीला तब्बल 7 ते 8 लाख रुपयांचं भांडवल त्याला गुंतवावं लागलं. हळूहळू व्यवसाय वाढवत नेत काटेकोर नियोजन केलं. आता या व्यवसायामधून विशाल महिन्याकाठी तब्बल एक लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्याच्याकडे स्वतःचीच हॅचरी असून या माध्यमातून महिन्याकाठी 700 ते 800 पिलांची निर्मिती केली जाते. एक महिन्याचा पक्षी दीडशे रुपये प्रति पक्षी या दराने विक्री केला जातो. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या पक्षांना मागणी आहे. त्याचबरोबर अंडी विक्री व मोठ्या पक्षांच्या विक्री मधूनही त्याला कमाई होत आहे.
advertisement
कुक्कुटपालन व्यवसायात नव्याने येणाऱ्य तरुणांनी 20 ते 25 कोंबड्यांपासून सुरुवात करावी. तसेच 100 ते 150 पिलांपासून देखील व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. जसा अनुभव येत जाईल, तसा व्यवसाय वाढवत न्यावा. व्यवसाय कोणताही असो त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न आणि काटेकोर नियोजन केलं तर चांगला आर्थिक फायदा मिळतो, असं विशाल लांडगे सांगतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
February 26, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बँकेच्या टार्गेटला वैतागून नोकरी सोडली, एक-दोन करत 50 कोंबड्या जमवल्या, आता कितीची कमाई?