Success story: सायकलवर विकले पापड, शेवया, पती-पत्नीच्या मेहनतीला फळ, आता वर्षाला 30 लाखांची उलाढाल

Last Updated:

सध्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 125 महिलांना रोजगार देत आहेत. एकेकाळी किलो-दोन किलोपासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज टनापर्यंत पोहोचला आहे.

+
उद्योजिका

उद्योजिका शोभा पाटील, सांगली

सांगली: मिरजेच्या सांगलीवाडीतील शोभा पाटील यांनी 17 वर्षांपूर्वी प्रति किलो 13 रुपये मजुरीवर पापड लाटण्यास सुरुवात केली होती. यातून त्यांना आठवड्याला 1300 रुपये मिळायचे. याच पैशाची बचत करून त्यांनी गुरुप्रसाद गृहउद्योग सुरू केला. सध्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 125 महिलांना रोजगार देत आहेत. एकेकाळी किलो-दोन किलोपासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज टनापर्यंत पोहोचला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शोभा पाटील आज दर वर्षाला 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी.
सांगली शहरापासून जवळच असलेले सांगलीवाडी गाव आहे. कृष्णा नदीकाठी हे गाव असल्याने महापुराचा फटका पिकांना बसतो. याच गावातील शोभा पांडुरंग पाटील यांच्या अंगी पहिल्यापासून संकटावर मात करण्याची जिद्द होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीला प्रक्रिया व्यवसायाची जोड द्यायला हवी, असा विचार त्यांनी केला. यातून त्यांनी पहिल्या टप्प्यात शेवया आणि पापड निर्मितीला सुरुवात केली.
advertisement
गृहउद्योगाचा प्रारंभ
2007 पासून शोभाताईंनी सांगली शहरातील दुकानदारांना पापड, शेवया विक्रीस सुरुवात केली. आलेली कोणतीही संधी न सोडता पीठ घेऊन मजुरीवर पापड, शेवया करून देण्यास सुरुवात केली. या वेळी प्रति किलो 13 रुपये मजुरी मिळत होती. त्यातून आठवड्याला 1300 रुपये हाती मिळू लागले. यातूनच गुरुप्रसाद गृहउद्योगाचा प्रारंभ झाला. उद्योग व्यवसाय वाढीबाबत उद्योजिका शोभाताईंनी सांगितले की, मला प्रक्रिया व्यवसायात कोणताही अनुभव नव्हता. टप्प्याटप्प्याने मला प्रक्रिया पदार्थाची मागणी लक्षात आली. हळूहळू पदार्थाची निर्मिती सुरू झाली. पण विक्री कशी करायची असा प्रश्न होताच. त्यामुळे पती पांडुरंग यांनी सांगली शहरात पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेतला. पापड, शेवया, लाडू, लोणचे यांसह अन्य पदार्थ पिशवीत भरून सायकलवरून विक्री सुरू केली. दुकाने, आठवडा बाजार अशा ठिकाणी विक्रीसाठी सुरुवात झाली.
advertisement
योग्य दर्जा आणि चवीमुळे हळूहळू व्यवसाय वाढू लागला. कोणत्या हंगामात कोणते पदार्थ तयार केले की त्यांना मागणी असते, याचा अभ्यास केला. त्यामुळे ग्राहकांकडून पदार्थांची मागणी वाढू लागली. पापड, कुरडयांचा व्याप वाढल्यानंतर दिवाळी, दसरा आणि अन्य सणांना डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारचे लाडू, चिवडा, शेव तसेच उपवासाच्या पदार्थांची निर्मिती सुरू केली. व्यवसायाला भांडवलाची आवश्यकता असते. हाताशी भांडवल असल्याशिवाय कर्जही उपलब्ध होण्यास अडचणी असतात. त्यामुळे सुरुवातीपासून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम हाताशी ठेवली. हळूहळू रक्कम वाढू लागली. हातात भांडवल आले. बँकेकडून 10 लाखांची सीसी मिळाली, 5 वर्षांत त्या सीसीची परतफेड केली. त्यामुळे बँकेकडून सीसीही वाढवून मिळाली.
advertisement
पुढे ग्राहकांकडून मागणी वाढू लागल्याने शोभाताईंनी गावातील गरजू महिलांना प्रक्रिया उद्योगात सहभागी करून घेतले. आज या उद्योगात गावशिवारातील सुमारे 125 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या महिलांना प्रति तासाला 30 रुपये असे मानधन दिले जाते. 5 महिलांचा गट तयार करून शोभाताई त्यांना कच्चा माल देतात. त्यांच्याकडून विविध खाद्यपदार्थ मजुरीवर तयार करून घेतले जातात. तसेच महिला अंगावर कामे घेऊन माल तयार करतात. विविध कौटुंबिक, धार्मिक समारंभात लाडू, गुलाबजाम, चपाती, पुरणपोळीची मागणी असते. पदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.
advertisement
प्रक्रिया व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना मार्केटचं निरीक्षण करत खाद्यपदार्थांची निर्मिती केल्याचे उद्योजिका शोभा सांगतात. सुरुवातीला त्यांच्यापुढे भांडवलाची मोठी अडचण होती. उद्योगातून मिळणारा सगळा पैसा उद्योगातच गुंतवून त्यांनी हळूहळू बचतीची रक्कम वाढवली आणि हाती भांडवल घेतले. व्यवसाय वाढीसाठी सन-समारंभ, प्रथा-परंपरा आणि लोकांच्या आवडी-निवडी लक्षात घेत पदार्थांचे प्रकार वाढवले. योग्य दर्जा आणि चवीमुळे व्यवसाय वाढू लागला आहे.
advertisement
याठिकाणी त्यांनी शेवया बनवण्याची मशीन खरेदी केली आहे. परंतु इतर कोणताही पदार्थ यंत्रावर बनवत नाहीत. हाताने बनवलेल्या पदार्थाची चव, यंत्राच्या पदार्थाला येत नसल्याचा अनुभव सांगत शोभाताई यांनी सव्वाशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. जिद्द, चिकाटी, व्यवस्थापन आणि हातच्या चवीमुळे शोभा पाटील गृहउद्योगात यशस्वी होत सर्वांसमोर एक आदर्श आणि प्रेरणा उभी केली आहे.
मराठी बातम्या/मनी/
Success story: सायकलवर विकले पापड, शेवया, पती-पत्नीच्या मेहनतीला फळ, आता वर्षाला 30 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement