हजारो कोटी नफा कमावणाऱ्या कंपनीने पगारवाढ रोखली; मंदीचे गडद सावट, कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Salary Hikes: व्यापार युद्धांमुळे भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पुढे ढकलली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे मिळणार आहे.
मुंबई: भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) एप्रिल महिन्यापासून लागू होणारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इतर देशांमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धांमुळे (Tariff war) वाढलेली व्यापक आर्थिक अनिश्चितता हे या निर्णयामागील मुख्य कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आर्थिक वर्षात पुढे परिस्थितीचा आढावा घेऊन आणि अधिक स्पष्टता आल्यानंतर ही पगारवाढ लागू केली जाईल. टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) मिलिंद लक्कड म्हणाले, आम्ही वर्षादरम्यान आढावा घेऊन पगारवाढ कधी करायची याचा निर्णय घेऊ.
इतके महाग सोने विकत घ्यायचे का? ही 10 कारणं तुमचा विचार बदलून टाकतील
पाच वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या सुरुवातीला जेव्हा जागतिक व्यवसाय ठप्प झाला होता. तेव्हाही टीसीएसने असाच निर्णय घेतला होता. सध्या आयटी सेवा क्षेत्रात कंपन्या खर्चात कपात करत असून, टीसीएसचा हा निर्णय त्याच सावध भूमिकेचा भाग दर्शवतो. पुढील आठवड्यात आपले तिमाही (Q4) निकाल जाहीर करणाऱ्या इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यादेखील असेच पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
advertisement
व्हेरिएबल पे आणि भरती सुरू राहणार
पगारवाढ थांबवली असली तरी, टीसीएस त्रैमासिक व्हेरिएबल पे (variable payouts) देणे सुरू ठेवणार आहे. चौथ्या तिमाहीसाठी (Q4) 70 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के व्हेरिएबल पे मिळेल. तर उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी हा पे त्यांच्या व्यवसायाच्या कामगिरीवर अवलंबून असेल, असे कंपनीने स्पष्ट केले.
advertisement
ग्राहकांकडून खर्चात कपात
कंपनीच्या मते, ग्राहकांकडून होणारा ऐच्छिक खर्च (Discretionary spending) अजूनही मर्यादित आहे. गेल्या महिन्याभरात टॅरिफ संदर्भात स्पष्टतेची वाट पाहत असल्यामुळे ग्राहकांकडून प्रकल्पांची गती वाढवण्यात (project ramp-ups) आणि खर्चात विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक के कृतिवासन म्हणाले, "जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर ऐच्छिक खर्चात आणखी विलंब होईल."
advertisement
नवीन भरती योजना
टीसीएस 2025-26 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून सुमारे 42,000 अभियंत्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. हा आकडा 2024-25 मध्ये केलेल्या भरतीच्या जवळपास आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 625 नवीन कर्मचारी जोडले. संपूर्ण आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या संख्येत 6,433 ने वाढ झाली आहे. जी मागील वर्षी झालेल्या 13,249 च्या घसरणीच्या उलट आहे.
advertisement
मात्र, कर्मचारी गळतीचा दर (Attrition) मागील तिमाहीतील 13 टक्क्यांवरून किंचित वाढून चौथ्या तिमाहीत 13.3 टक्के झाला आहे. मार्च अखेरीस टीसीएसमध्ये एकूण 6,07,979 कर्मचारी होते.
नेतृत्वामध्ये दोन महत्त्वाच्या नियुक्त्या
गेल्या वर्षी एन जी सुब्रमण्यम यांच्या निवृत्तीनंतर सुमारे एका वर्षाने टीसीएसने नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (COO) नियुक्ती केली आहे. टाटा सन्सच्या माजी मुख्य डिजिटल अधिकारी असलेल्या आरती सुब्रमण्यन 1 मे पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी टीसीएसच्या सीओओ, कार्यकारी संचालक (ED) आणि अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. टाटा सन्समध्ये त्यांनी विविध उद्योगांमधील समूहाच्या डिजिटल, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम उपक्रमांचे नेतृत्व केले.
advertisement
तसेच, टीसीएसने मंगेश साठे यांची मुख्य रणनीती अधिकारी (Chief Strategy Officer) म्हणून नियुक्ती केली आहे. साठे हे पूर्वी टाटा सन्स येथील टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपचे सीईओ होते. ते आता टीसीएसच्या जागतिक सल्ला सेवा (global consulting practice) आणि विलीनीकरण व अधिग्रहण (mergers and acquisitions) विभागाचे नेतृत्व करतील. हे दोन्ही नवनियुक्त अधिकारी सीईओ के कृतिवासन यांना रिपोर्ट करतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/मनी/
हजारो कोटी नफा कमावणाऱ्या कंपनीने पगारवाढ रोखली; मंदीचे गडद सावट, कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट