Paali Language Protest : मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी आंदोलन सुरू; नेमकं कारण काय?
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Paali Language : पाली भाषेच्या संवर्धनासाठी आणि मान्यतेसाठीच आता मुंबई विद्यापीठात एक विद्यार्थी लढा देत आहे.
मुंबई: पाली भाषा ही भारतातील सर्वात जुनी, प्राचीन आणि महत्त्वाची भाषा मानली जाते. गौतम बुद्धांच्या वाङ्मयाचा वारसा जपणारी ही भाषा केवळ शास्त्रीय परंपरेचा भाग नाही, तर भारतीय सांस्कृतिक इतिहासातील एक भक्कम स्तंभ आहे. अशा पाली भाषेच्या संवर्धनासाठी आणि मान्यतेसाठीच आता मुंबई विद्यापीठात एक विद्यार्थी लढा देत आहे.
भदंत विमांसा, हे बौद्ध भिक्षू असून ते मराठी विषयातून पीएचडी करीत आहेत. त्यांनी पाली भाषेला स्वतंत्र आणि एडेड विभाग मिळावा या मागणीसाठी शांततेचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 23 दिवसांपासून ते विद्यापीठ परिसरात ठामपणे या मागणीसाठी बसले आहेत.
advertisement
त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की पाली भाषेला स्वतंत्र एडेड विभाग स्थापन करून न्याय द्यावा. “विद्यापीठाने नवीन विभागांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली, मात्र पाली विभागावर अन्याय होत आहे. VC सरांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत,” असे विमांसा यांचे म्हणणे आहे.
भदंत विमांसा यांनी आंदोलनादरम्यान हेही अधोरेखित केले की पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही. CEBS Encroachment जमिनीवरून विद्यापीठाने हस्तक्षेप करून ती जागा मुक्त केल्यास, तिथे किमान ३०० विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा मिळू शकते. मात्र, विद्यापीठ प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
“मी एकटा आंदोलन करत आहे, पण माझ्या अंगावरचे चिवर हे फक्त वस्त्र नाही तर माझ्या समाजाचा आधार आहे. त्यामुळे या लढ्यात मी एकटा नाही,” असे सांगून त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या समाजाच्या पाठिंब्याचा उल्लेख केला.
या आंदोलनातून ते पाली विभागाच्या अस्तित्वासाठी, सांस्कृतिक दडपशाहीविरुद्ध आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी लढा देत आहेत. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या ध्येयाने हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 13, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Paali Language Protest : मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी आंदोलन सुरू; नेमकं कारण काय?









