Malad News: 8 वर्षांचा दिव्यांश खेळता खेळता इमारतीत गेला परत आलाच नाही, मुंबईतील हृदयद्रावक घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मालाड पूर्वेमध्ये गुरूवारी 8 वर्षीय मुलगा खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मुंबई: मुंबईतल्या मालाड पूर्वेमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गुरूवारी सायंकाळी एका 8 वर्षीय मुलगा खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये खेळताना त्याचा चेंडू पडल्यामुळे तो काढण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. बांधकामासाठी खोदलेला खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामध्ये पडून त्या 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे मालाड पूर्वेमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 8 वर्षीय दिव्यांश राजेश मौर्य मित्रांसोबत घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. म्हणून तो खाली खड्ड्यात चेंडू काढण्यासाठी गेला. पण खड्ड्यातल्या पाण्याचा त्याला कोणताही अंदाज न आल्यामुळे त्याला बाहेर येता आलं नाही. शेवटी त्याचा त्या पाण्यामध्ये गुदमरून जीव गेला. मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेजमधील आंबेवाडी परिसरामध्ये ही घटना घडली. दरम्यान, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे दिव्यांशला पाण्याचा जराही अंदाज आला नाही.
advertisement
कुरार व्हिलेज परिसरामध्ये खोदलेला खड्डा एका खासगी बिल्डरने बिल्डिंगीसाठी खोदलेला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंबई पोलिसांकडून त्याला बाहेर काढून लगेचच सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिव्यांशला कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. पण त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. खरंतर, बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे निष्पाप 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. खड्ड्याच्या शेजारी कोणत्याही प्रकारची बॅरिकेटिंग, सुरक्षा रक्षक किंवा काहीही बांधलेलं सुद्धा नव्हतं. इतकंच नाही तर, साधी सुरक्षा भिंतही बांधलेली नव्हती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 10:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Malad News: 8 वर्षांचा दिव्यांश खेळता खेळता इमारतीत गेला परत आलाच नाही, मुंबईतील हृदयद्रावक घटना










