Bandra Versova Sea Link: पावसाळ्यात मंदावलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामाला वेग, 25 टक्के काम पूर्ण
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Bandra Versova Sea Link Project Work Gains: मुंबईत सध्या वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प. पावसाळा संपताच या प्रकल्पाच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.
मुंबई: मुंबईत सध्या वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प. पावसाळा संपताच या प्रकल्पाच्या कामांना पुन्हा वेग आला असून, पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी हा प्रकल्प वाहतूक सुसूत्रीकरणाचा नवा मार्ग ठरणार आहे.
पावसाळ्यानंतर समुद्रातील कामांना गती
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पावसाळ्यानंतर समुद्रातील कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या चारही दिशांनी सध्या मोठ्या प्रमाणावर सागरी काम सुरू आहे. पावसाळ्यादरम्यान सुरक्षा कारणास्तव समुद्रातील काम थांबवण्यात आले होते. मात्र त्याच काळात वर्सोवा, कार्टर रोड आणि जुहू बाजूच्या कनेक्टरचे जमिनीवरील बांधकाम सुरू ठेवण्यात आले, ज्यामुळे प्रगती कायम ठेवण्यात आली.
advertisement
प्रकल्पाचा आकार आणि वैशिष्ट्ये
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, वांद्रे-वर्सोवा सी लिंकची एकूण लांबी 17.7 किलोमीटर असून त्यातील मुख्य सागरी सेतू 9.60 किलोमीटर लांबीचा असेल. हा सेतू सुमारे 900 मीटर समुद्राच्या आत बांधला जाणार आहे आणि एकूण आठ मार्गिका (लेन) असतील. या सी लिंकच्या माध्यमातून वांद्रे-वरळी सी लिंकवरील ताण कमी होणार असून वर्सोवा, जुहू, सांताक्रूझ आणि बांद्रा परिसरांतील प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
advertisement
25 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
सध्या या प्रकल्पाचे सुमारे 25 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. समुद्रात अवजड साहित्य उतरविण्याचे आणि पायाभूत रचना उभारणीचे काम सुरू असून, अधिकारी सांगतात की आता कामांना अपेक्षित गती मिळत आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते. त्या वेळी हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कोविड-19 काळात लागू झालेली टाळेबंदी, कामगारांची अनुपलब्धता आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे काम रखडले. या विलंबामुळे प्रकल्पाची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून आता हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
18, 120 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प या प्रकल्पाचा एकूण खर्च तब्बल 18,120 कोटी रुपये एवढा आहे. हा मुंबईतील सर्वात महागडा सागरी पूल ठरणार आहे. या सी लिंकच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून समुद्रातील प्रबल वारे आणि भरती-ओहोटीचा दबाव सहन करणारी मजबूत रचना तयार केली जात आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या अंधेरी, जुहू आणि वांद्रे परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच हा पूल वांद्रे-वर्ली सी लिंकशी जोडला जाणार असल्याने मुंबईच्या किनाऱ्यावरील सागरी महामार्ग नेटवर्क अधिक सक्षम आणि सुसंगत होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 8:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bandra Versova Sea Link: पावसाळ्यात मंदावलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामाला वेग, 25 टक्के काम पूर्ण


