Prasad Lad : विधीमंडळाबाहेर वातावरण तापलं, सत्ताधारी राजीनाम्यासाठी आक्रमक, दानवेंनीही स्पष्टच सांगितलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाजावेळी दानवे यांनी शिवीगाळ केल्यानं आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळात प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राजकारण तापलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाजावेळी दानवे यांनी शिवीगाळ केल्यानं आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं प्रसाद लाड म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तर अंबादास दानवे यांनी मी राजीनामा देणार नाही आणि माफी मागणार नाही असं स्पष्ट सांगितलं.
विधीमंडळात अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यानं सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. अंबादास दानवे यांनी म्हटलं की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी राजीनामा देणार नाही. माफी मागणार नाही. भाजपने दीडशे खासदारांना निलंबित केलं होतं. त्यांनी संसदीय भाषा, कायदे मला शिकवण्याची गरज नाही.
मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाच्या बाण्याने केलं आहे. मी पळपुट शेपूट घालणारा थोडी आहे. हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे बाडगे शिकवत आहेत. सत्तेसाठी आणि पैशासाठी इकडे तिकडे फिरतात असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.
advertisement
अंबादास दानवे यांचं ऑक्टोबरपर्यंत निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केली. यावर प्रतिक्रिया विचारली असता अंबादास दानवे म्हणाले की, त्यांना जे करायचंय ते करु द्या, आता त्यांना नियम, संविधान कायदे आठवतायत. याआधी त्यांना कायदे म्हणजे घरची जहागीरदारी वाटायची. शिवसैनिक आहे आणि मी शिवसैनिकाच्या बाण्याने उत्तर दिलंय. विरोधी पक्षनेता आक्रमकच असायला हवा. राष्ट्रपतींकडे, सभापतींकडे जाऊन माझ्या राजीनाम्याची मागणी करावी. सत्ताधाऱ्यांना जे करायचंय ते करावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2024 11:06 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Prasad Lad : विधीमंडळाबाहेर वातावरण तापलं, सत्ताधारी राजीनाम्यासाठी आक्रमक, दानवेंनीही स्पष्टच सांगितलं