Goregaon- Mulund Link Road: जपानवरून आलं अवाढव्य मशीन, मुंबईत बांधला जातोय सर्वात मोठा बोगदा; कुठे सुरू आहे काम?

Last Updated:

गोरेगाव- मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात, 5.3 किलोमीटर लांबी आणि तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य जलद गतीने सुरू आहे.

Goregaon- Mulund Link Road: जपानवरून आलं अवाढव्य मशीन, मुंबईत बांधला जातोय सर्वात मोठा बोगदा; कुठे सुरू आहे काम?
Goregaon- Mulund Link Road: जपानवरून आलं अवाढव्य मशीन, मुंबईत बांधला जातोय सर्वात मोठा बोगदा; कुठे सुरू आहे काम?
गोरेगाव- मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात, 5.3 किलोमीटर लांबी आणि तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य जलद गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांची (Tunnel Boring Machines - TBM) आवश्यकता आहे. यापैकी एका TBM चे सर्व घटक भाग कार्यस्थळी दाखल झाले आहेत. ऑगस्‍ट 2026 मध्‍ये बोगदा खोदकामास प्रत्‍यक्षात सुरूवात होणार आहे. या टप्प्यानंतर रस्‍ते प्रकल्पाच्या कामास अधिक गती मिळणार आहे. या जोड रस्‍ते प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले.
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा 3(ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे 5.3 किलोमीटर लांबीच्‍या, तिहेरी मार्गिका असलेल्‍या बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक 31 ऑक्‍टोबर 2025) या कामाची प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.
advertisement
अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) बांगर यांनी प्रारंभी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील जोश मैदान येथे भेट दिली. भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे आवश्यक आहेत. यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग जोश मैदान या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे सुटे भाग जपानहून एकूण 77 कंटेनरमधून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या बोगदा खनन संयत्राचे घटक भाग डिसेंबर 2025 पर्यंत कार्यस्थळी दाखल होण्याची अपेक्षा आहे. या घटक भागांची पाहणी करत बांगर यांनी माहिती घेतली. या बोगदा खनन संयंत्राच्‍या घटक भागांची जोडणी (Assembling) ऑगस्‍ट 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर, दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्‍या घटक भागांची जोडणी ऑक्‍टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्‍यानंतर बोगदा खोदकामास प्रत्‍यक्षात सुरूवात होईल.
advertisement
तिहेरी मार्गिका असलेल्या पेटी बोगद्याचे काम अभियांत्रिकीदृष्‍ट्या आव्हानात्‍मक स्‍वरुपाचे आहे. बोगदा खनन संयंत्रांच्या सहाय्याने एकूण सुमारे 5.3 किलोमीटर लांबीपर्यंत दुहेरी बोगदयांचे खोदकाम करण्यात येणार आहे. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर सुमारे 6.62 किलोमीटरपर्यंत वाढेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे 14.42 मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बोगदे मुंबई महानगर क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे ठरतील, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
advertisement
त्यानंतर बांगर यांनी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य सुरू असलेल्‍या ठिकाणास भेट दिली. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे 200 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल आहे. आतापर्यंत सुमारे 100 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदीच्या क्षेत्रात खोदकाम सुरू करण्यात आले असून, 10 मीटर खोलीपर्यंतचे कार्य पूर्ण झाले आहे. खोदकाम खोलवर सुरू असून बाजूच्‍या भिंती खचू नयेत म्‍हणून 'रॉक ऍंकरिंग' केले जात आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील सातही दिवस अहोरात्र म्‍हणजेच 24 तास काम सुरू आहे. याच गतीने युद्धपातळीवर कार्यवाही करून डिसेंबर 2028 पर्यंत प्रकल्‍पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
advertisement
अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे.विशेषत: दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग (Link) स्‍थापित होणार आहे. पश्चिमेकडील मुंबई किनारी रस्ता (Mumbai Coastal Road) ते मालाड माईंडस्‍पेस आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडला जाणार आहे. कोणत्‍याही अडथळ्याशिवाय सिग्‍नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय थेट मालाड ते ऐरोलीदरम्‍यान प्रवास करणे सुलभ होणार आहे. पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे यामधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे, तसेच वाहतुकीवरील ताणही मोठ्या प्रमाणात हलका होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Goregaon- Mulund Link Road: जपानवरून आलं अवाढव्य मशीन, मुंबईत बांधला जातोय सर्वात मोठा बोगदा; कुठे सुरू आहे काम?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement