Mumbai News : उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, BMC आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
वांद्रे ते धारावी दरम्यानच्या उड्डाणपूल पुनर्बांधणी अंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुलाचे बांधकाम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावे. प्रकल्पस्थळी उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या पुलाचे कार्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहेत.
वांद्रे ते धारावी दरम्यानच्या उड्डाणपूल पुनर्बांधणी अंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुलाचे बांधकाम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावे. प्रकल्पस्थळी उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या पुलाचे कार्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहेत. हे काम १८ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. काम सुरू झाल्यानंतर पूल बांधणीचा कालावधी वाढू नये आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयादरम्यानच्या आकाशमार्गिका पुनर्बांधणीचे काम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करावे, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामामार्फत विविध पूल प्रकल्प, आकाश मार्गिका उभारण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल, वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. ॲनी बेझंट मार्ग यांच्या दरम्यानच्या नाल्यावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वांद्रे येथील आकाश मार्गिका या कामांची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक १७ सप्टेंबर २०२५) प्रत्यक्ष भेट देऊन केली. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्या सह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
advertisement
मिठी नदी पात्र रुंदीकरण अंतर्गत वांद्रे ते धारावी येथे पुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मिठी नदीचा प्रवाह वेगाने समुद्रात मिसळावा, यासाठी नदीच्या समुद्र संगम स्थळी मुखाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. पाण्याच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा या उद्देशाने धारावी येथील उड्डाणपुलाची पुनर्बांधणी दोन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील पुलाच्या दक्षिणेकडील दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होतील. या नव्या मार्गांमुळे माहीम कॉजवेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार असून वाहतुकीचा वेग वाढणार आहे. शिवाय सुलभ आणि सुरक्षितता वाढणार आहे.
advertisement
प्रकल्पस्थळी उभारण्यात येणऱ्या दुसऱ्या पुलाचे कार्यादेश (Work Order) लवकरच जारी करण्यात येणार आहेत. हे काम १८ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी काम पुर्णत्वाचा कालावधी निश्चित करावा. यासोबतच कामांची ठोस कालमर्यादा आखून वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (N.O.C) तसेच इतर अनुषंगिक आवश्यक परवानग्या पूर्वीच प्राप्त कराव्यात. काम सुरू झाल्यानंतर कालावधी वाढू नये आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
advertisement
वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. ॲनी बेझंट मार्ग यांच्या दरम्यानच्या नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामाची पाहणी श्री. बांगर यांनी केली. या पुलाच्या संरेखनामुळे दोन्ही प्रमुख मार्गांना थेट जोडणी मिळून नवीन वाहतूक दुवा (Link) निर्माण होणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर वरळी नाका, महालक्ष्मी व लोअर परळ परिसरातील वाहतुकीवरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुलभ, जलद व सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत या पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बांगर यांनी सांगितले.
advertisement
वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयादरम्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून आकाशमार्गिकेची (Skywalk) पुनर्बांधणी केली जात आहे. या आकाश मार्गिका (Skywalk) कामाची पाहणी श्री. बांगर यांनी केली. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आकाश मार्गिकेचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी आकाश मार्गिका नागरिकांच्या वापरासाठी खुली व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. आकाश मार्गिकेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पुढील ३ महिन्यात पूर्ण करावीत. कामाच्या विविध टप्पानिहाय कालमर्यादा निश्चित करून दिल्या आहेत. या कामात कोणताही विलंब होता कामा नये. विहित कालमर्यादेचे पालन न केल्यास कंत्राटदारावर सक्त कारवाई करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, BMC आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश