काम सुपरफास्ट झालं पाहिजे, CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; मुंबईतील सर्वात मोठा प्रोजेक्ट 1 हजार 95 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश
- Reported by:Tushar Rupanwar
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईकरांसाठीचा मेट्रोचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मेट्रो लाइन 8. ही मेट्रो लाइन मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्या, अशा देखील सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्या, प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करा, प्रकल्प रेंगाळू देऊ नका असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करा, प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्या असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
advertisement
कोणकोणत्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर आहे. 24.636 किमीचा उन्नत मार्ग (Elevated) असून एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत असणार आहेत.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके आहेत. दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर असून 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
advertisement
नाशिक शहर परिक्रमा मार्ग
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्यात आली आहे. मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर असून या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
गडचिरोलीतील खनिज वाहतुकीसाठी चार पदरी सिमेंट महामार्ग
गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता देण्यात आली आहे. चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग असणार आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 3:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
काम सुपरफास्ट झालं पाहिजे, CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; मुंबईतील सर्वात मोठा प्रोजेक्ट 1 हजार 95 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश








