एकच शाळा, एकच बाक आणि आता एकत्र व्यवसाय; सख्ख्या मैत्रिणी फूड ट्रकमधून कमावतायत लाखोंचं उत्पन्न
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
एकच शाळा, एकच वर्ग आणि एकच कॉलेज अशा प्रवासानंतर बालवयात मस्करीत बोललेलं ‘एकत्र व्यवसाय सुरू करायचं’ हे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने सत्यात उतरवलं आहे.
मुंबई : शाळेमध्ये पाहिलेली स्वप्नं ही बहुतेक वेळा स्वप्नच राहतात. पण त्याला अपवाद ठरल्या आहेत अंधेरीतील तन्वी, श्रुती आणि दिव्या या तीन खास मैत्रिणी. एकच शाळा, एकच वर्ग आणि एकच कॉलेज अशा प्रवासानंतर बालवयात मस्करीत बोललेलं ‘एकत्र व्यवसाय सुरू करायचं’ हे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने सत्यात उतरवलं आहे.
तीन वर्षांपूर्वी या तिघींनी सात ते आठ लाख रुपयांची गुंतवणूक करून ‘मोमोज फूड ट्रक’ सुरू केला. दिवसभर आपल्या-आपल्या क्षेत्रातील नोकरी आणि काम सांभाळून संध्याकाळी चार वाजता त्या तिघी एकत्र येतात. त्यानंतर रात्री नऊ-दहापर्यंत या फूड ट्रक चालवतात. श्रुती ही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करते, तन्वी एका बँकेत नोकरी करते, तर दिव्या मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःचा व्यवसाय सांभाळते. दिवसभराचं कष्टाचं काम करूनही या तिघी संध्याकाळी फूड ट्रकवर नव्या उत्साहाने उभ्या राहतात.
advertisement
मोमोज तयार करणे, त्यासोबत वेगवेगळे व्हेज-नॉनव्हेज पदार्थ, डिशेस बनवणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणे – हे सर्व त्या स्वतः करतात. आज या फूड ट्रकला स्थानिक पातळीवर चांगली लोकप्रियता मिळाली आहे. अंधेरी परिसरात संध्याकाळी या ट्रकपाशी नेहमीच ग्राहकांची वर्दळ दिसते. चविष्ट पदार्थ, परवडणारी किंमत आणि तीन तरुणींच्या उत्साही सेवेमुळे हा फूड ट्रक लोकांना विशेष आवडतो. सुरुवातीला मस्करीत पाहिलेलं स्वप्न, नंतर खूप विचार करून केलेली छोटी गुंतवणूक आणि त्यानंतर सातत्याने केलेली मेहनत – यामुळेच आज तन्वी, श्रुती आणि दिव्या यांना वर्षाला दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 8:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
एकच शाळा, एकच बाक आणि आता एकत्र व्यवसाय; सख्ख्या मैत्रिणी फूड ट्रकमधून कमावतायत लाखोंचं उत्पन्न