Mumbai News : हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात आंधळी अन् झटक्यात कंगाल झाली, भामट्या सोबतचा रोमान्स पडला महागात
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Mumbai Crime News : कॅनेडियन अभिनेता आणि गायक केयानू रिव्हजसोबत बोलणं 69 वर्षीय महिलेला चांगलंच महागात पडलंय. त्याच्या नादात तिला लाखो रूपयांचा तोटा झाला आहे.
आपण आपल्या आवडत्या कलाकारासोबत बोलावं असं प्रत्येकाला वाटतं. आपला आवडता सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्यासोबत जर बोलत असेल सहाजिकच आपला आनंद गगनात मावेनासा होतो. पण एका महिलेला आपल्या आवडत्या कलाकारासोबत बोलणं चांगलंच अंगलट आलंय. कॅनेडियन अभिनेता आणि गायक केयानू रिव्हज याच्यासोबत बोलणं 69 वर्षीय महिलेला चांगलंच महागात पडलंय. त्याच्या नादात तिला लाखो रूपयांचा तोटा झाला आहे. नेमका प्रकार काय आहे, सविस्तर प्रकरण जाणून घेऊया...
वर्सोवातल्या चार बंगला जवळ एक 69 वर्षीय वृद्ध महिला राहते. जी तिथे एकटीच राहते. तिची 41 वर्षीय मुलगी परदेशामध्ये राहते. ही वृद्ध महिला कायमच सोशल मीडियावर असते. त्यांच्या अनेक गोष्टींचा तपशील मुलीकडे असतो. या वृद्ध महिलेचे कॅनरा बँकेत खातं आहे. ज्याचे तपशील लंडनमध्ये राहणाऱ्या मुलीकडे आहेत. ती ई- मेलच्या माध्यमातून आईच्या बँकेतील व्यवहारावर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मुलीला 30 जूनला एक ई-मेल आला. ज्यामध्ये तिच्या आईच्या खात्यातून एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर 65 हजार रूपये पाठवल्याची माहिती होती.
advertisement
डेहराडूनमध्ये तर आपल्या कोणी ओळखीचे नाही, मग आईने पैसे कोणाला पाठवले? असा प्रश्न त्या मुलीच्या मनामध्ये उद्भवला. त्यानंतर लगेचच तिने आईला बऱ्याचदा या प्रश्नाचं उत्तर विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आईने उत्तर देण्याचं टाळाटाळ केलं. पण नंतर आईने जे काही सांगितलं ते ऐकून मुलीला धक्का बसला. वृद्ध महिलेला काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर कॅनेडियन अभिनेता आणि गायक केयानू रिव्हज याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट आल्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झालं. ती महिला आणि कॅनेडियन अभिनेता इन्स्टाग्रामवर आणि टेलिग्रामवरही संपर्कात होते.
advertisement
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलत असताना त्यांच्यातील जवळीक अधिकच वाढली. मेसेजवर बोलताना ती वृद्ध महिला अभिनेत्याच्या व्यक्तिमत्व आणि बोलण्यावर भाळली आणि त्याच्या प्रेमात पडली. त्या अभिनेत्यानेही तिला भेटण्यासाठी भारतात येणार असल्याचं सांगितले. त्यासाठी त्याला भारतीय चलनाची गरज असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याने आयडीबीआय बँकेच्या एका खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. त्यानुसार वृध्द महिलेने डेहराडून येथील आशा नहार नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यावर 65 हजार रूपये पाठवले. हा अभिनेता तोतया असून फसवणुकीचा प्रकार असल्याचे मुलीने आईला सांगितले.
advertisement
वृद्ध महिलेला इन्स्टा रिक्वेस्ट पाठवणारा व्यक्ती तो कॅनेडियन अभिनेता आणि गायक नव्हता. अभिनेता आणि गायकाच्या नावाने एका तोतया व्यक्तीने खोटं अकाऊंट उघडून त्या वृद्ध महिलेला फसवलं. हा अभिनेता एक भामटा होता. त्याने अभिनेत्याच्या नावाने बनावट खाते उघडून महिलेला जाळ्यात ओढले आणि तिची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६६ (क), ६६ (ड) आणि फसवणुकीचे कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.
advertisement
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा घेत सायबर भामटे लोकांची विविध प्रकारे फसवणूक करीत असतात. त्यामुळे कुणाशीही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असं आवाहन अनेकदा पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात आंधळी अन् झटक्यात कंगाल झाली, भामट्या सोबतचा रोमान्स पडला महागात