Mumbai Local : मुंबईत रविवारी रेल्वे सेवा विस्कळीत! 153 ट्रेन रद्द, 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा पूर्ण बंद
Last Updated:
Mumbai Local Train Update : रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे लोकलचे काही स्थानकांवरील थांबे रद्द करण्यात आले असून अनेक लोकल गाड्या रद्द राहणार आहेत.
मुंबई : रविवारी सुट्टी असल्याने जर तुम्ही लोकलने प्रवास करत बाहेर जाण्याचा विचार करताय तर थांबा,ही बातमी नक्की वाचा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही स्थानकांवरील लोकल गाड्यांचा थांबा रद्द करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.\
अनेक स्थानकांवर लोकल थांबणार नाही
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.55 वाजता सुरू होऊन दुपारी 3.55 वाजेपर्यंत असेल. या कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
advertisement
ट्रान्स-हार्बर मार्गावरही प्रवासाचा खेळखंडोबा
तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे. या मार्गावरील काही लोकल सेवा रद्द किंवा उशिराने धावण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर 153 लोकल रद्द
view commentsदरम्यान पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळे मोठा परिणाम होणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी एकूण 153 लोकल गाड्या रद्द राहतील. यामध्ये अप मार्गावरील 79 आणि डाऊन मार्गावरील 74 लोकल सेवांचा समावेश आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत जलद मार्गावर तर अप धीम्या मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असेल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासावे आणि आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 7:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबईत रविवारी रेल्वे सेवा विस्कळीत! 153 ट्रेन रद्द, 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा पूर्ण बंद










