कामाची बातमी: मोनोरेलची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई मोनोरेल सेवा एमएमआरडीएने तांत्रिक सुधारणा, नवीन रेक आणि अत्याधुनिक सिग्नलिंगसाठी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. प्रवाशांना पर्यायी वाहतूक वापरावी लागेल.
मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झालीय. मागील काही दिवसांपासून सातत्यानं मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळं चर्चेत होती. यामुळंच एमएमआरडीएनं मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे.
हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येतेय. यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून, दोन गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे. याशिवाय MMRDA ने 10 नवीन ‘मेक-इन-इंडिया' रेकची खरेदी केलीय. मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे.
advertisement
मुंबई मोनो रेल दररोज सकाळी 6.15 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत धावत असल्याने, तांत्रिक देखभाल आणि नवी उपकरणं बसवण्यासाठी फक्त रात्रीचं मर्यादित 3.5 तासांचं अंतर उपलब्ध होतं. या अल्प वेळेत पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज आणि रीचार्जसारख्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत असल्याने कामाची गती मंदावत होती. त्यामुळे अखंडपणे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि चाचण्या घेण्यासाठी काही काळ सेवा पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
या कालावधीत जुन्या रेक्सचे ओव्हरहॉलिंग आणि रेट्रोफिटिंग केलं जाणार आहे. यामुळे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड टाळले जातील. त्याचबरोबर आगामी मेट्रो प्रकल्पांसाठी मनुष्यबळाचं प्रशिक्षण आणि पुनर्विनियोजन करण्यासाठीही ही विश्रांती उपयुक्त ठरणार आहे.
मागील दोन महिन्यांत मोनो रेल सेवेत तांत्रिक अडचणींमुळे तीनदा मोठा व्यत्यय आला होता. या घटनांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर एमएमआरडीएने चौकशी समिती नेमली असून, दीर्घकालीन विश्वासार्हता आणि सुरक्षिततेसाठीच सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 8:18 AM IST