Mumbai Local: मुंबईची लोकल ठप्प होणार? लाईफलाईनचे सारथीच थकले, मोटरमनचा थेट इशारा
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: मुंबईची लाईफलाईन धावतेय पण लोकल चालवणारे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर कामाच्या ताणामुळे हैराण झाले आहेत. चर्चगेटला एकत्र येत त्यांनी संताप व्यक्त केला.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा सुरळीत चालवण्याचे काम मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर करतात. पण प्रशासनाचा वाढता दबाव आणि प्रशासनाचा मनमानी कारभार या विरोधात पश्चिम रेल्वेचे कर्मचारी नाराज झाले आहेत. रनिंग स्टाफवर वाढते कामाचे ओझे, डबल ड्युटी आणि सततचा मानसिक ताण यामुळे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर आक्रमक झाले असून, आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चर्चगेटमध्ये कर्मचाऱ्यांचा संताप व्यक्त
पश्चिम रेल्वेतील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकातील लॉबीमध्ये निषेध बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. लोकल सेवा सुरळीत चालवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
वाढता कामाचा दबाव आणि डबल ड्युटी
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. अनेकदा नियमित सुट्ट्या न देता सलग आणि डबल ड्युटी करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरवर मानसिक तसेच शारीरिक ताण प्रचंड वाढला आहे.
advertisement
सलग काम, पुरेशी विश्रांती न मिळणे आणि सततचा दबाव याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मानसिक थकवा आणि शारीरिक कमजोरी वाढत असूनही प्रशासनाकडून परिस्थितीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
advertisement
कॅन्टीन बंद, मूलभूत सुविधांचा अभाव
याशिवाय, चर्चगेट येथील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरसाठी असलेले कॅन्टीन गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. दीर्घ ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने नाराजी अधिकच वाढली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका
कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, थकलेल्या कर्मचाऱ्यांवर लोकल ट्रेन चालवण्याची जबाबदारी टाकल्यास प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ कर्मचाऱ्यांचा नसून, मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाशी थेट जोडलेला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
advertisement
जर मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांच्या समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत, तर पश्चिम रेल्वेतील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन मोठे आणि तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. या निषेध बैठकीला मोठ्या संख्येने मोटरमन, ट्रेन मॅनेजर आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 9:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईची लोकल ठप्प होणार? लाईफलाईनचे सारथीच थकले, मोटरमनचा थेट इशारा











