mega block time table: मुंबईकरांचे मेगाहाल करणार Mega block, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
mega block time table: मुंबईत वीकेंडला तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच मुंबईकरांना घराबाहेर पडावं लागेल.
मुंबई: वीकेंडला अनेक मुंबईकर बाहेर जाण्याचा विचार करतात. पण आता बाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागणार आहे. मध्य रेल्वेनं रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी या मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वे मरिन लाइन्स ते महीमदरम्यान आज, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेणार आहे. मात्र, उद्या, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेचा कोणताही ब्लॉक असणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीये.
दरम्यान, ब्लॉकच्या काळात रेल्वे रुळांसोबतच सिग्नल देखभार-दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे काही लोकल उशिरा धावणार असून काही फेऱ्या रद्द देखील करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार या अप आणि डाउन धीमा मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही फेऱ्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
advertisement
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
पनवेल ते वाशी हार्बर अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 या काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते बनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल या मार्गादरम्यान दोन्ही मार्गांवरील सर्व फेऱ्या रद्द राहणार आहेत. तर सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरुळ आणि बेलापूर / नेरुळ ते उरण दरम्यान सर्व फेऱ्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
advertisement
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स ते माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 या काळात डाउन धीमा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. ब्लॉक रात्रकालीन असल्यामुळे दिवसाच्या फेऱ्यांवर कोणताही प्रभाव पडणार नाही, त्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2024 9:18 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
mega block time table: मुंबईकरांचे मेगाहाल करणार Mega block, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा