Mumbai Metro : मुंबई मेट्रोचा मास्टरस्ट्रोक! 5 प्रमुख स्थानकांवर बस सेवा सुरू; अवघ्या 9 रुपयांत गाठा तुमचे ऑफिस
Last Updated:
Mumbai Metro-3 : मेट्रो3 प्रवाशांसाठी एमएमआरसीने पाच स्थानकांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक्वा लाइन सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली असून गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारताही वाढवण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांना शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी सोपी व्हावी यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-3 मार्गिकेवरील पाच प्रमुख स्थानकांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांत मेट्रो प्रवाशांची संख्या वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कोणत्या भागात बस सेवा सुरु होणार?
सुरुवातीच्या टप्प्यात सिटीफ्लो बस सेवेसोबत भागीदारी करून बीकेसी, वरळी, आरे, जेव्हीएलआर आणि सीएसएमटी या पाच स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बससेवेचे भाडे केवळ 9 रुपयांपासून सुरू होणार असून गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी बस उपलब्ध राहणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार पुढील काळात या सेवेचा विस्तारही केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान वरळी ते कफ परेडदरम्यानचा भूमिगत मेट्रो 3 म्हणजेच एक्वा लाइनचा अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 33.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील प्रवासी संख्या दुप्पट झाली आहे.
तीन महिन्यांत मरोळ नाका स्थानकात विक्रमी प्रवाशांची ये-जा
उपनगरीय रेल्वे आणि इतर मेट्रो मार्गांशी जोडणी असलेल्या स्थानकांवर सर्वाधिक प्रवासी दिसून येत आहेत. अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाइन 1 आणि मेट्रो लाइन 7 शी जोडलेले मरोळ नाका स्थानक हे महत्त्वाचे इंटरचेंज ठरले असून ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येथे 16.45 लाख प्रवाशांची ये-जा नोंदवली गेली. त्यानंतर सीएसएमटी स्थानकात 10.28 लाख प्रवासी नोंदले गेले.
advertisement
मेट्रो 3 चा अंतिम टप्पा सुरू होण्यापूर्वी सप्टेंबरमध्ये प्रवासी संख्या 19.7 लाख होती ती डिसेंबरमध्ये 46.56 लाखांपर्यंत पोहोचली. 5 जानेवारीपासून मेट्रो-3 च्या फेऱ्या 265 वरून 292 करण्यात आल्या असून त्यामुळे गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता सहा मिनिटांवरून सुमारे तीन मिनिटांपर्यंत कमी झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुंबई मेट्रोचा मास्टरस्ट्रोक! 5 प्रमुख स्थानकांवर बस सेवा सुरू; अवघ्या 9 रुपयांत गाठा तुमचे ऑफिस










