मुंबईकर मेट्रो प्रवास करताय? मग सामानाची चिंता सोडा, या मार्गावर स्मार्ट लॉकर!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Metro: मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. आता मेट्रो स्टेशनवर स्मार्ट लॉकर उपलब्ध होणार असून सामानाची चिंता मिटणार आहे.
मुंबई: मुंबईच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर या मेट्रो-1 मार्गिकेवरील प्रवाशांसाठी आता प्रवास अधिक सोयीस्कर होत आहे. प्रवासादरम्यान किंवा मेट्रो स्थानकांच्या परिसरात कामानिमित्त थांबावे लागल्यास जड किंवा अवजड सामान हातात घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही. कारण मेट्रो-1 मार्गिकेवरील सर्व 12 स्थानकांमध्ये अत्याधुनिक ‘स्मार्ट लॉकर’ सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सशुल्क असून प्रवाशांना प्रति तास 20 ते 30 रुपये खर्च करून सुरक्षितपणे सामान ठेवता येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे लॉकर तिकीट मिळणाऱ्या परिसरातच बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रोने प्रवास न करणाऱ्या नागरिकांना लॉकर वापरायचे असल्यास तिकीट काढूनच स्थानकात प्रवेश मिळेल. ही सुविधा ‘ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड’ या फिनटेक कंपनीने उभारली आहे. कंपनीने मेट्रो स्थानकांतील उपलब्ध जागा भाडेपट्ट्यावर घेऊन एकूण 996 स्मार्ट लॉकर्स बसवले आहेत. त्यात लहान आणि मोठ्या असे दोन आकार उपलब्ध आहेत. लहान लॉकरमध्ये 5 किलोपर्यंत तर मोठ्या लॉकरमध्ये 10 किलोपर्यंत सामान ठेवता येते. अनुक्रमे 20 आणि 30 रुपये प्रतितास असा यांचा दर आहे.
advertisement
लॉकर वापरण्याची प्रक्रिया सोपी आणि पूर्णपणे डिजिटल आहे. प्रवाशाने आपला मोबाईल क्रमांक टाकताच ओटीपी येतो. तो टाइप केल्यानंतर पेमेंटसाठी क्यूआर कोड स्क्रीनवर दिसतो. पेमेंट झाल्यावर संबंधित प्रवाशाला एक सिक्रेट पिन मिळतो आणि त्याद्वारे लॉकर उघडता येते. त्यामुळे सुरक्षिततेचा उच्च दर्जा कायम राहतो.
advertisement
मुंबईची पहिली मेट्रो मानल्या जाणाऱ्या मेट्रो-1 मार्गिकेवर सुरू झाल्यापासून 11 वर्षांत तब्बल 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज साधारण 5 लाख प्रवासी या मार्गिकेचा वापर करतात. गर्दीच्या या मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांना सर्वाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने स्मार्ट लॉकरची निवड करण्यात आली. दिल्ली मेट्रोत अशाप्रकारचे लॉकर आधीच कार्यरत असून त्याचे मॉडेल सुधारित स्वरूपात मुंबईत आणले आहे.
advertisement
दरम्यान, नवीन स्मार्ट लॉकर सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि तणावविरहित होण्याची अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 1:56 PM IST


