Mumbai Coastal Road: मुंबई ते विरार आता फक्त काही मिनिटांचा प्रवास, कसा असणार नवा सागरी मार्ग?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Coastal Road: मुंबई ते विरार प्रवास आता सागरी मार्गाने अधिक जलद होणार आहे. उत्तन ते विरार दरम्यान सागरी सेतूच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून आता मुंबई ते विरार प्रवास अधिक जलद होणार आहे. उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला (एमएमआरडीए) मंजुरी दिली आहे. तर विरार ते पालघर दरम्यानच्या टप्पा 2 चा देखील व्यवहार्यता अभ्यास करण्यात येतोय. हा सागरी सेतू 8 मार्गिकांचा असणार असून उत्तर-दक्षिण प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
उत्तन ते विरार सागरी सेतू पुढे थेट दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड व लिंक रोडवरील वाहतुकीचा ताण देखील या सागरी सेतूमुळे कमी होणार आहे. मुंबई आणि विरारला काही मिनिटांत जोडणाऱ्या या कॉरिडॉरमुले प्रवास अधिक वेगवान होणार असल्याचा दावा 'एमएमआरडीए'ने केला आहे.
advertisement
पहिल्या टप्प्याला मंजुरी
उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी एमएमआरडीए मार्फत केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा विकास झपाट्याने होणार आहे. नुकतेच सुधारित टप्पा- 1 प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात वर्सोवा ते उत्तन हा भग येतो. त्यामुळे सध्याच्या संरेखनातून हा भाग वगळण्यात आला आहे.
advertisement
दोन टप्प्यांत विभागणी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित वर्सोवा-विरार सागरी सेतू म्हणून या प्रकल्पाची संकल्पना सुरुवातीला मांडण्यात आली होती. पुढे ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या बैठकीत हा प्रकल्प 'एमएमआरडीए'कडे वर्ग करण्यात आला. तर फेब्रुवारी 2024 मध्ये प्रकल्पाची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली.
advertisement
आर्थिक मदत
जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) या प्रकल्पासाठी 72 टक्के बाह्य निधी (इतर देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणारी आर्थिक मदत) प्राप्त होणार आहे. तर, राज्य सरकार, 'एमएमआरडीए' यांच्याकडून 28 टक्के निधी येईल. नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठी 87 हजार 427 कोटी रुपये इतक्या सुधारित प्रकल्प खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
कसा आहे प्रकल्प?
पहिल्या टप्प्याची एकूण लांबी ही 55.12 किलोमीटरची असेल. यामध्ये सागरी सेतू आणि जोड रस्त्यांचा देखील समावेश आहे. उत्तन ते विरार सागरी सेतू एकूण 24.35 किलोमीटर लांबीचा असेल. उत्तन जोडरस्ता 9.32 किलोमीटर, वसई जोडरस्ता 2.5 किमी, विरार जोडरस्ता 18.95 किलोमीटर लांबीचा असेल.
advertisement
दरम्यान, कॉरिडॉरमुळे दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ कमी लागणार असून वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात देखील वैद्यकीय मदत वेळेत पोहोचवता येईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Coastal Road: मुंबई ते विरार आता फक्त काही मिनिटांचा प्रवास, कसा असणार नवा सागरी मार्ग?


