Mumbai News : दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त? सॅण्डहर्स्ट रोडवरील हँकॉक पुलाच्या कामाबद्दल सर्वात मोठी अपडेट आली समोर
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Hancock Bridge Work Incomplete : सॅण्डहर्स्ट रोडवरील हँकॉक पुलाचे काम दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही पूर्ण झालेले नाही. आता उच्च न्यायालयाने या कामाचा सद्यस्थिती अहवाल मागवला आहे.
मुंबई : प्रभादेवी परिसरात सुरू असलेल्या नव्या पुलाच्या कामामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या भागात वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असल्याने नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी काही विशेष नियम लागू करून वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी गर्दीचा ताण सतत वाढत आहे.
मुंबईत अशा अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू आहेत. मात्र, सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल याला अपवाद आहे. दहा वर्षांपूर्वी हा पूल धोकादायक असल्याचे कारण देत पाडण्यात आला होता, परंतु आज दशक उलटूनही या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
दशकभरापासून रखडलेले काम
2016 साली हा पूल जुना आणि धोकादायक ठरल्याने पाडण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने नवीन पूल उभारण्याची घोषणा केली. 2019 पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु आज जवळपास दहा वर्ष उलटूनही हा पूल पूर्ण झालेला नाही.
advertisement
रेल्वे हद्दीतील गर्डर टाकण्यात आले असले तरी दुसऱ्या बाजूचा भाग अर्धवटच आहे.
म्हाडा आणि पालिकेचा वाद अडथळा
या प्रकल्पातील मुख्य अडथळा म्हणजे म्हाडाच्या जुन्या इमारती. पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी सुमारे सहा ते सात इमारती पाडाव्या लागणार आहेत. या इमारतींमध्ये अनेक कुटुंबे आणि व्यावसायिक गाळेधारक राहत आहेत. त्यांचे पुनर्वसन कोण करणार म्हाडा की पालिका यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये वाद सुरू आहे. म्हाडा म्हणते, ''हा प्रकल्प पालिकेचा आहे,''तर पालिका म्हणते, ''इमारती म्हाडाच्या आहेत, त्यामुळे पुनर्वसन त्यांचे'' या जबाबदारी ढकलण्याच्या खेळामुळे पुलाचे काम थांबले आहे.
advertisement
नागरिकांना त्रास कायम
हँकॉक पूल बंद असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण वाढला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. ''दहा वर्षांपूर्वी पूल पाडला, पण आजतागायत पूर्ण झाला नाही. शहर मेट्रो बनतंय, पण आमचा पूल अजूनही नाही,''अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त? सॅण्डहर्स्ट रोडवरील हँकॉक पुलाच्या कामाबद्दल सर्वात मोठी अपडेट आली समोर