मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव, असा असणार सोहळा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाही संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई: देशात सोमवार (दि. 26 ऑगस्ट) रोजी मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाही सिद्धिविनायक मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सिद्धिविनायक मंदिराकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
श्रीकृष्ण जन्माची वेळ रात्री 12.40 वाजता आहे. सिद्धिविनायक मंदिरात रात्री 11 ते 1.15 या कालावधीत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये 'श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा, श्रीविष्णू सहस्रनामाने तुळशी पत्र अर्पण, श्रीकृष्ण जन्मकथा, नामस्मरण, पाळणा व त्यानंतर श्रीकृष्णाची आरती असा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 1.15 ते 1.30 च्या दरम्यान शेजारती होईल आणि गाभारा बंद करण्यात येईल. त्यानंतर मंदिरातील मानाची 'दही हंडी' फोडण्यात येईल.
advertisement
दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात काकड आरती व महापूजा पहाटे 1.30 ते 3 या वेळेत होते. परंतु, 27 रोजी पूजेच्या पूर्वतयारीसाठी 1 तासांचा कालावधी मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे काकड आरती आणि महापूजा 1.30 वाजता न होता 2.30 ते 4 या कालावधीत करण्यात येईल. त्यामुळे मंदिर भाविकांसाठी दर मंगळवार प्रमाणे पहाटे 3.15 वाजता न उघडता 4.15 वाजता उघडण्यात येईल. तसेच पहाटेची आरती नेहमी प्रमाणे होईल, अशी माहितीही सिद्धिविनायक मंदिरच्या वतीने देण्यात आलीये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2024 10:26 PM IST