Eastern Freeway: नो सिग्नल, नो ट्रॅफिक... आता ठाण्यातून दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत; कधीपर्यंत काम पूर्ण होणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्प अंतर्गत घाटकोपरच्या छेडा नगर ते ठाण्याच्या आनंद नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्प अंतर्गत घाटकोपरच्या छेडा नगर ते ठाण्याच्या आनंद नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2,682 कोटी रूपयांचा असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते दक्षिण मुंबईमधील प्रवास फक्त 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या इस्टर्न फ्रीवेच्या कामाला आता सुरूवात झाली आहे.
एमएमआरडीएने सिग्नलमुक्त प्रवासासाठी इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याची योजना आखली. या योजनेअंतर्गत एकूण 13.90 किमी लांबीचा छेडा नगर (घाटकोपर) ते आनंद नगर (ठाणे) असा उन्नत 6 पदरी हाय- स्पीड मार्ग बांधण्यात येणार आहे. या हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या 25- 30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. सध्या इस्टर्न फ्रीवे हा मानखूर्दला संपतो. नवीन विस्तारानुसार हा मार्ग छेडा नगरपासून सुरू होतो. घाटकोपर, रमाबाई नगर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जेव्हीएलआर, एरोली आणि मुलुंडमार्गे ठाण्यातील आनंद नगर येथे संपेल.
advertisement
इस्टर्न फ्रीवे कसा असेल?
हाय- स्पीड कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलासोबत मुलुंड ऑक्ट्रोय नाक्यावरील आणखी एका उन्नत कॉरिडॉरसोबत सुलभपणे जोडला जाईल, ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गासोबत देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे.
advertisement
Soon: South Mumbai–Thane in just 25 minutes
MMRDA has commenced construction of the Elevated Eastern Freeway Extension, a 13.9 km, fully elevated 6-lane high-speed corridor that will dramatically reduce travel time between South Mumbai and Thane to 25–30 minutes, while easing… pic.twitter.com/9vL689iC7U
— MMRDA (@MMRDAOfficial) December 1, 2025
advertisement
इस्टर्न फ्रीवे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईसह उपनगरातील वाहतूक अधिकच सुरळीत होईल. प्रदूषण कमी होईल शिवाय लाखो नागरिकांना अधिक वेगवान, विश्वासार्ह्य आणि पर्यावरण पूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. त्याप्रमाणेच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक गतिविधींनाही गती मिळेल. एमएमआरडीएच्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून तसेच तज्ञ आणि पर्यावरण प्रेमी यांच्याशी विचार विमर्श करून याआधी प्रकल्पाचा विक्रोळी ते घाटकोपर पट्टा पुनर्रचित करण्यात आला आहे. त्यामुळे 127 पिंक ट्रम्पेट वृक्ष वाचवले गेले आहेत. त्याचप्रमाणे भरपाई लागवड स्वरूपात एकूण 4,175 नवी झाडे सुद्धा लावली जाणार आहेत.
advertisement
इस्टर्न फ्रीवेचे मुख्य वैशिष्ट्ये
- 2.5 मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, मजबूत पीयर्स, 40 मीटर स्पॅन आणि 25 मीटर सिंगल-सेगमेंट सुपर स्ट्रक्चर
- MMR मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली
- मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे 2 पदरी अप-डाऊन रॅम्प
- नवघर उड्डाणपूल येथे 3+3 पदरी उन्नत टोल प्लाझा
- अखंड, सुरक्षित आणि हाय- स्पीड प्रवासासाठी डिझाइन
advertisement
सध्या इस्टर्न फ्रीवेचे प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण, टेस्ट पाइल्स पूर्ण, भू- तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण, युटिलिटी ओळखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण, वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर असे सध्याचे स्थिती अहवाल आहे. " 'Mumbai In Minutes' उपक्रमांतर्गत रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचे जाळे विस्तारित आणि अधिक सक्षम करून मुंबई महानगर प्रदेशातील शहरी कनेक्टिव्हिटीची पुनर्कल्पना आम्ही करत आहोत.आमच्या या मिशनमध्ये हा प्रकल्प एक महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांचे जीवनमान आणि प्रवासाचा दर्जा उंचावत, मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक दर्जाचा प्रदेश बनवण्याच्या दिशेने आमची वाटचाल आहे.", अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएने दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Eastern Freeway: नो सिग्नल, नो ट्रॅफिक... आता ठाण्यातून दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत; कधीपर्यंत काम पूर्ण होणार?


