नवी मुंबईत वस्तरा गँग ॲक्टीव्ह, मध्यरात्री करतेय भयंकर कांड, त्रिकूट अटकेत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Navi Mumbai: पुण्यातील कोयता गँग चर्चेत असताना आता नवी मुंबईत एक वेगळीच गँग ॲक्टीव्ह झालीय.
नवी मुंबई: पुण्यातील कोयता गँग संपूर्ण राज्यभरात चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना पुणे शहरासह आसपासच्या भागात घडल्या आहेत. पुण्यातील कोयता गँग चर्चेत असताना आता नवी मुंबईत एक वेगळीच गँग अॅक्टीव्ह झालीय. येथील एक त्रिकूट हातात वस्तरा घेऊन मध्यरात्री नवी मुंबई परिसरात भयंकर कांड करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
या तिघांनी नवी मुंबईच्या कळंबोली सर्कलजवळ बल्कर चालकाला वस्तऱ्याचा धाक दाखवून लुटलं होतं. तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या त्रिकुटाने काही दिवसांपूर्वी एका बँक व्यवस्थापकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी, एका बँक व्यवस्थापकाला रात्रीच्या वेळी नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कलजवळ रिक्षाची वाट पाहत असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्यात आले होते. पोलीस या घटनेतील चोरट्यांचा शोध घेत असताना, १४ सप्टेंबर रोजी रात्री कळंबोली येथे बल्कर चालकाला वस्तऱ्याचा धाक दाखवून लुटल्याची दुसरी घटना घडली. दोन्ही घटनांमधील साम्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि अखेर या त्रिकुटाला जेरबंद करण्यात यश मिळवले.
advertisement
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दोन्ही गुन्हे कबूल केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लागण्यास मदत झाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. या यशामुळे नवी मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी याआधी अशाप्रकारे आणखी किती गुन्हे केले, याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:08 PM IST