20 लेकरांसाठी कांचनबाई मधमाशांशी एकट्या लढल्या, शेवटचा मुलगा वाचला अन्... अंगणवाडी सेविकेने प्राण सोडला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अंगणवाडीमधल्या 20 लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कांचन बाईंनी थेट मधमाशांना अंगावर घेतलं. मधमाशांचा या हल्ल्यामध्ये चिमुरड्यांच्या केसालाही धक्का लागला नाही, पण कांचन बाईंना त्यांचा जीव गमवावा लागला.
अंगणवाडीमधल्या 20 लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कांचन बाईंनी थेट मधमाशांना अंगावर घेतलं. मधमाशांचा या हल्ल्यामध्ये चिमुरड्यांच्या केसालाही धक्का लागला नाही, पण कांचन बाईंना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मधमाशांचा एक मोठा थवा अचानक अंगणवाडीमध्ये खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर आला. मधमाशांना पाहून अंगणवाडीमधल्या स्वयंपाकी कांचनबाई मेघवाल यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता जवळच असलेली ताडपत्री आणि चटई घेतली. या ताडपत्री आणि चटईमध्ये त्यांनी मुलांना गुंडाळलं.
मुलांचं रक्षण करत असताना मधमाशांनी कांचनबाईंवर हल्ला केला. शेकडो मधमाशांनी कांचनबाईंना दंश केला, पण शेवटचं मूल सुरक्षित होईपर्यंत कांचनबाई मागे हटल्या नाहीत. मध्य प्रदेशमधल्या नीमच जिल्ह्यातील मडवडा पंचायतीतल्या अंगणवाडीमध्ये ही घटना घडली आहे.
मुलांचा जीव वाचवल्यानंतर प्राण सोडले
मधमाशा हल्ला करत आहेत, हे पाहिल्यानंतर गावकरी मदतीसाठी धावले तोपर्यंत कांचनबाई बेशुद्ध पडल्या होत्या. कॉन्स्टेबल कालुनाथ आणि पायलट राजेश राठोड यांनी कांचनबाईंना आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कांचनबाईंच्या शरीरावर असंख्य मधमाशांचे डंख होतेय
advertisement
कांचनबाई फक्त अंगणवाडी सेविका नव्हत्या. त्या गावातील मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवत होत्या, जय माता दी स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ होत्या. त्यांचे पती शिवलाल यांना अर्धांगवायू झाला आहे. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
मंगळवारी शवविच्छेदनानंतर जेव्हा त्यांचे पार्थिव रानपूर गावात पोहोचले, तेव्हा गावकऱ्यांनी कांचनबाईंच्या शौर्याला सलाम केला. कांचनबाईंच्या धाडसाचं शब्दात वर्णन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.
advertisement
मधमाशांच्या या हल्ल्यानंतर गावात अजूनही भीती आहे. अंगणवाडी केंद्राजवळील झाडाला एक मोठं मधमाशांचं पोळं लटकलेलं आहे, जिथे गावाचा एकमेव हातपंप आहे. आणखी एका हल्ल्याच्या भीतीने रहिवाशांनी पाणी आणणे बंद केले आहे. गावकरी मधमाशांचं पोळं त्वरित हटवण्याची आणि कांचनबाईंच्या शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.
Location :
Neemuch,Madhya Pradesh
First Published :
Feb 04, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/देश/
20 लेकरांसाठी कांचनबाई मधमाशांशी एकट्या लढल्या, शेवटचा मुलगा वाचला अन्... अंगणवाडी सेविकेने प्राण सोडला!







