Delhi Election 2025 Voting: इंद्रप्रस्थवर कोणाची सत्ता? दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू, आप-भाजप-काँग्रेसमध्ये लढत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Delhi Assembly Election Voting 2025: निवडणूक प्रचारादरम्यान आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. आज मतदारराजा दिल्लीची सत्ता कोणाच्या हाती सोपवणार याचा निर्णय घेणार आहे.
दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होणार असून शनिवारी निकाल लागणार आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. आज मतदारराजा दिल्लीची सत्ता कोणाच्या हाती सोपवणार याचा निर्णय घेणार आहे.
दिल्ली विधानसभेसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आप आपल्या सत्ताकाळातील लोककल्याणकारी योजनांच्या आधारे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. तर, जवळपास 25 वर्षानंतर भाजप दिल्लीतील सत्तेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दिल्लीत 2013 पर्यंत काँग्रेस सलग 15 वर्ष सत्तेत होती. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत आपली कामगिरी चांगली करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे.
advertisement
मतदानासाठी कडक बंदोबस्त...
आज, बुधवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले असून कडक सुरक्षेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगाने शांततेत मतदान पार पाडण्यासाठी निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या, दिल्ली पोलिसांचे 35,626 कर्मचारी आणि 19,000 होमगार्ड तैनात केले आहेत. सुमारे 3000 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत आणि यापैकी काही ठिकाणी ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस दल तैनात केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी क्विक रिअॅक्शन टीम्स (क्यूआरटी) देखील तैनात केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
प्रचारात कोणत्या मुद्यांवर भर?
'आप'ने त्यांच्या प्रशासन मॉडेलवर लक्ष केंद्रित केले आणि अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी शहरभर रॅली काढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून 'आप'वर हल्ला चढवला.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला आणि विविध मुद्द्यांवर आप आणि भाजपवर हल्ला केला. निवडणूक प्रचारादरम्यान, "शीशमहाल" वाद, यमुनेच्या पाण्याची गुणवत्ता, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, महिला कल्याण आणि मतदार यादीत छेडछाडीचे आरोप यासारखे मुद्दे जोरदारपणे उपस्थित करण्यात आले. निवडणुकीत प्रचारा दरम्यान मोफत सुविधा देण्याचे आश्वासनही चर्चेत होते.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
February 05, 2025 7:43 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Election 2025 Voting: इंद्रप्रस्थवर कोणाची सत्ता? दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू, आप-भाजप-काँग्रेसमध्ये लढत