पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप, निवडणुकीत मोठा उलटफेर; ओवैसींनी सत्तेचं गणित बिघडवले, ममतांच्या बालेकिल्ल्यात फूट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
West Bengal Assembly Election: ओवैसी आणि हुमायूं कबीर यांच्या आघाडीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. या युतीमुळे टीएमसीच्या मुस्लिम वोटबँकेत फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोलकाता: देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पाचपैकी सर्वाधिक चर्चा आहे ती पश्चिम बंगालमधील निवडणुकांची होय. राज्यात ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे.
राज्याच्या राजकारणात एक अशी चाल खेळली गेली आहे, ज्यामुळे टीएमसी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहिल्यांदाच जाहीर केले आहे की, त्यांची पक्ष आगामी विधानसभा निवडणुका मुर्शिदाबादमधील प्रभावशाली नेते हुमायूं कबीर यांच्या सोबत लढणार आहे.
ओवैसींचा हा निर्णय केवळ निवडणूक आघाडी नसून, तो थेट बंगालमधील ‘मुस्लिम वोटबँक’मध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. ही वोटबँक ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे ओवैसींचे हे पाऊल भाजपासाठीही फायदेशीर मानले जात आहे.
advertisement
AIMIM पश्चिम बंगालमध्ये हुमायूं कबीर यांच्या ‘आम जनता उन्नयन पार्टी’सोबत आघाडी करून निवडणूक लढवेल. हा निर्णय घेण्यात आला आहे की आम्ही बंगालमध्ये हुमायूंच्या पक्षासोबत आघाडी करू. मजलिसचे उमेदवार या आघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढतील. आमचे प्रतिनिधी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन गरीबांचा आवाज उठवतील, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
ओवैसी यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. बंगालमध्ये 30 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही सुमारे 5 लाख बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट रद्द करण्यात आले आहेत. मालद्यातील पंचायत निवडणुकीत मजलिसला 60 हजार मते मिळाली होती आणि हीच लढाई पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
हुमायूं कबीर यांनी उमेदवारांची घोषणा
हुमायूं कबीर यांनी अलीकडेच ‘आम जनता उन्नयन पार्टी’ची स्थापना केली आहे. त्यांनी या आघाडीला प्रत्यक्षात आणण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. रविवारी मुर्शिदाबादमधील रेजीनगर येथील पक्ष कार्यालयातून त्यांनी 153 उमेदवारांची घोषणा केली. सुरुवातीला 182 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची योजना होती, मात्र सध्या 153 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कबीर यांच्या या निर्णयामुळे आणि ओवैसींसोबतच्या त्यांच्या युतीमुळे बंगालमधील निवडणूक समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
advertisement
ममता बॅनर्जींसाठी का वाढली चिंता?
या आघाडीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे, ते म्हणजे ‘मुस्लिम फॅक्टर’. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 27 ते 30 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. राज्यातील 294 विधानसभा जागांपैकी 100 हून अधिक जागांवर अल्पसंख्याक मतदार थेट निकाल ठरवतात.
मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हा मतदारवर्ग मोठ्या प्रमाणावर टीएमसीच्या बाजूने एकवटलेला होता. त्यामुळे भाजपाच्या प्रयत्नांनंतरही ममता बॅनर्जी सत्तेत राहिल्या. मात्र आता ओवैसी आणि कबीर यांच्या युतीमुळे या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर या आघाडीने 10 ते 15 हजार मतेही खेचली, तर अनेक जागांवर टीएमसीला मोठा फटका बसू शकतो.
advertisement
ममता यांच्या गडातही आव्हान
ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही केवळ मतांची फूट नसून थेट राजकीय आव्हान आहे. हुमायूं कबीर यांनी त्यांच्या आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघांमध्येही उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी भवानीपूर (ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ) आणि नंदीग्राम (शुभेंदू अधिकारी यांचा मतदारसंघ) येथे मजबूत अल्पसंख्याक उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. या दोन महत्त्वाच्या जागांसाठी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत, पण ही घोषणा स्वतःतच मोठी रणनीती मानली जात आहे. तसेच कबीर यांनी स्वतः रेजीनगर आणि नौदा या दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
ओवैसींची शोधमोहीम पूर्ण
ओवैसी आणि हुमायूं कबीर यांची ही युती बंगालच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण करत आहे. असदुद्दीन ओवैसी हे राष्ट्रीय पातळीवर प्रभावशाली मुस्लिम नेते म्हणून ओळखले जातात, मात्र बंगालमध्ये त्यांना नेहमीच स्थानिक मजबूत चेहऱ्याची गरज होती. मागील निवडणुकांमध्ये AIMIM ला मोठे यश मिळाले नव्हते. मात्र हुमायूं कबीर यांच्या रूपाने त्यांना तो मजबूत स्थानिक आधार मिळाला आहे. कबीर हे मुर्शिदाबादमधील प्रभावशाली नेते असून त्यांचे स्थानिक नेटवर्क मजबूत आहे. ओवैसींची राष्ट्रीय ओळख आणि कबीर यांचा स्थानिक प्रभाव एकत्र आल्यास, ही युती अल्पसंख्याकबहुल जागांवर मोठी ताकद ठरू शकते.
advertisement
भाजपाला कसा फायदा?
या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक फायदा भारतीय जनता पक्षाला (भाजपा) होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते बंगालमध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाची वाट पाहत होते. टीएमसीचा सर्वात मोठा आधार हा मुस्लिम मतदारांचा एकगठ्ठा पाठिंबा आहे, हे भाजपाला चांगले माहीत आहे. ओवैसी आणि कबीर यांची युती जितकी मजबूत होईल, तितकी टीएमसीची मतं विभागली जातील. आणि जिथे टीएमसीची मतं तुटतील, तिथे भाजपासाठी विजयाचा मार्ग सुकर होईल. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये हिंदू आणि मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास समान आहे, तिथे ही युती भाजपासाठी ‘संजीवनी’ ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 11:06 PM IST
मराठी बातम्या/देश/
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप, निवडणुकीत मोठा उलटफेर; ओवैसींनी सत्तेचं गणित बिघडवले, ममतांच्या बालेकिल्ल्यात फूट










