Jaya prada : अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहिम; दिल्ली, मुंबईत छापे
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पोलिसांच्या अचानक छाप्यामुळे जया प्रदा आणि त्यांच्या स्टाफमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टाफचे मोबाईल फोन बंद आहेत.
दिल्ली, 28 डिसेंबर : उत्तर प्रदेश पोलीस ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना शोधत आहेत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार-आमदार कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. तसेच न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस या बॉलिवूड अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं दिल्ली आणि मुंबईत दाखल झाली आहेत.
पोलिसांनी जया प्रदा यांच्या रामपूरसह, दिल्ली आणि मुंबईतील ठिकाणांवरही छापा मारला. मात्र अद्याप पोलिसांना त्या सापडलेल्या नाहीत. सध्या पोलिसांसमोर १० जानेवारीपर्यंत त्यांना शोधून आणून न्यायालयात हजर करण्याचं आव्हान आहे. जयाप्रदा रामपूर मतदारसंघातून २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात आचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
आचारसंहिता लागू असताना रस्त्याचं उद्घाटन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पिपलिया मिश्र गावात सभेमध्ये आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं होतं.
जया प्रदा यांच्याविरोधातील प्रकरणाची सुनावणी एमपीएमएलए स्पेशल कोर्टमध्ये सुरू आहे. या प्रकरणी गेल्या अनेक तारखांना जयाप्रदा न्यायालयात हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यासोबत न्यायालयाने पोलीस अधीक्षकांचे पथक स्थापन करून अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी राजेश द्विवेदी यांच्या एका पथकाला दिल्ली, मुंबईला रवाना केलं. मात्र दोन्ही ठिकाणी त्या नसल्याचं आढळलं.
advertisement
पोलिसांच्या अचानक छाप्यामुळे जया प्रदा आणि त्यांच्या स्टाफमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टाफचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणं आणखी कठीण बनत चाललं आहे. पोलिसांचे विशेष पथक रामपूरमधील जया प्रदा यांच्या नर्सिंग कॉलेजमध्येही पोहोचलं होतं. तिथून जया प्रदा यांचे ऑफिस आणि घराची माहिती घेण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2023 9:07 AM IST
मराठी बातम्या/देश/
Jaya prada : अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहिम; दिल्ली, मुंबईत छापे