Chhatrapati Sambhajinagar: 105 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाने सहकाऱ्यांच्या विधवांसाठी पुकारला यल्गार, बेमुदत उपोषण सुरू
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त व्हावा, यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी स्थानिकांनी मोठा संघर्ष केला होता. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली होती. मात्र, सरकार आता या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग विसरलं असल्याचं दिसत आहे. मुक्तिसंग्राम लढ्यात स्वत:ला झोकून दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची पेंशन अभावी परवड सुरू आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या विधवांना पेंशन मिळावी यासाठी पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील 105 वर्षांचे उत्तम कुडके यांनी रविवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम' दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांची होणारी हेळसांड सरकारच्या निदर्शनास यावी, यासाठी उत्तम कुडके यांनी उपोषण सुरू केलं आहे. शासनाने गौरव केलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक सध्या हयात नाहीत. पण, त्यांच्या विधवांना पेंशन मिळत होती. मात्र, सरकारने 2015 पासून पेंशन बंद केली आहे.
advertisement
उत्तम कुडके यांना स्वतःला पेंशन मिळते. पण, सहकाऱ्यांच्या विधवांना मिळणारी पेंशन बंद केल्यामुळे त्यांनी या वयात शासनाकडे न्याय मागितला आहे. उत्तम कुडके, स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा पत्नी सुंदराबाई धुताडमळ, द्रोपदाबाई गुंजाळ, सिंधू सानप, सोनाबाई मेंडके यांच्यासह 50 हून अधिक जणांनी बेमुदत उपोषणात सहभाग घेतला आहे.
advertisement
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयासमोर विविध संघटनांनी आपापल्या मागण्यांसाठी आंदोलनं सुरू केली आहेत. अन्याय अत्याचार भ्रष्टाचारविरोधी समितीने गेवराई बुकबॉण्ड येथील मुस्लिम बांधवांसाठी गायरानातून 20 गुंठे जागा कब्रस्तानाला देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. याशिवाय, भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथे बुद्ध विहारासमोर अवैधरीत्या बसवण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसह संबंधितांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अनेकांनी उपोषण सुरू केलं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 16, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Chhatrapati Sambhajinagar: 105 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाने सहकाऱ्यांच्या विधवांसाठी पुकारला यल्गार, बेमुदत उपोषण सुरू