American Presidential Election : 'कमला हॅरिस क्लिंटनच्या नोकर', अमेरिकेच्या महिला खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या निवडीच्या चर्चांबाबत तुलसी गबार्ड यांनी चिंता व्यक्त केलीय.
मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या निवडीच्या चर्चांबाबत तुलसी गबार्ड यांनी चिंता व्यक्त केलीय. तुलसी या अमेरिकेतील पहिल्या हिंदू (माजी) खासदार आहेत. हॅरिस राष्ट्रपती बनल्या तर ते अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल, तसंच हॅरिस या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या नोकर आहेत, अशी टीका तुलसी यांनी केलीय. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतून जो बायडेन यांनी माघार घेतली आहे व संभाव्य उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने अधिकृतपणे कमला यांचं नाव जाहीर केलेलं नसलं तरी त्यांचं नाव निश्चित असल्याचं मानलं जातंय. दरम्यान, अमेरिकन काँग्रेसच्या माजी खासदार आणि अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी हॅरिस यांच्यावर धक्कादायक टीका केली आहे. हॅरिस या हिलरी क्लिंटन यांच्या नोकर असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कमला अमेरिकेच्या राष्ट्रपती बनल्या तर ते अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल, असं गबार्ड यांनी म्हटलंय. हॅरिस या राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख बनण्याच्या योग्यतेच्या नाहीत, असं गबार्ड यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच तुलसी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांच्या व्हिडिओ पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, की ‘बायडेन बाहेर आणि कमला आत; पण तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. कारण धोरणं बदलणार नाहीत. बायडेन जसे स्वतः निर्णय घेत नव्हते, तसेच कमला हॅरिसही घेणार नाहीत. त्या ‘डीप स्टेट’चा नवा चेहरा आणि युद्धाच्या दलालांच्या सरदार असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या नोकर आहेत. सगळ्या जगाला युद्धात ओढण्याचे आणि आपलं स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचे प्रयत्न ते लोक सुरूच ठेवतील.’
advertisement
डेमोक्रॅटिक पक्षाकडून 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तुलसी या उमेदवार होत्या. युद्ध आणि शांततेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर कमला कशा निर्णय घेऊ शकतील, असा प्रश्न तुलसी यांनी उपस्थित केलाय. अमेरिकन सैन्याला संकटात टाकण्याचा निर्णय त्या कशा घेऊ शकतील, अशी बोचरी टीका त्यांनी केलीय. तसंच कमला हॅरिस यांच्या धोकादायक निर्णयांचे परिणाम प्रत्येक अमेरिकन नागरिकाला भोगावे लागतील असंही तुलसी यांचं म्हणणं आहे. कमला हॅरिस आणि हिलरी क्लिंटन यांच्या साम्य असून क्लिंटन यांच्यावर केलेली टीका कमला यांनाही लागू होते असं तुलसी गबार्ड यांनी म्हटलंय. तुलसी यांनी क्लिंटन यांना युद्ध करणाऱ्यांचा नेता असं म्हटलं होतं.
advertisement
कमला हॅरिस राष्ट्रपती झाल्या तर बायडेन यांच्या राष्ट्रपती कार्यकाळावर प्रभाव टाकणाऱ्या युद्धाच्या दलालांची नोकर बनून राहील, अशी टीका तुलसी यांनी केलीय. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत कमला यांच्याविरुद्ध मतदान करून ट्रम्प यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन तुलसी यांनी केलंय. शांतता आणि स्वातंत्र्य जपण्याच्या आणि आपल्या देशावर प्रेम करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि त्यामुळेच ट्रम्प यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2024 11:55 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
American Presidential Election : 'कमला हॅरिस क्लिंटनच्या नोकर', अमेरिकेच्या महिला खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य


