पोट भरण्यासाठी सैनिकांसोबत लैंगिक संबंध, नकार दिला तर...महिलेनं सांगितलं भयाण वास्तव
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
युद्धग्रस्त सुदान देशामध्ये महिलांना आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात आहे.
मुंबई : युद्धग्रस्त सुदान देशामध्ये महिलांना आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात आहे. 'द गार्डियन'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. सुदानमधल्या ओमदुरमन (Omdurman) शहरातून पळून आलेल्या 24 हून अधिक महिलांनी सांगितलं, की सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवणं हा त्यांच्यासाठी अन्न किंवा वस्तू मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. या वस्तूंच्या विक्रीतून या महिला आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे मिळवतात.
'द गार्डियन'शी बोलताना एका महिलेनं सांगितलं, की शहरातल्या अन्नधान्य साठवल्या जाणाऱ्या सर्व कारखान्यांमध्ये त्यांचं शोषण केलं जातं. एक स्त्री म्हणाली, 'माझे आई-वडील दोघंही खूप वृद्ध आणि आजारी आहेत. मी माझ्या मुलीला अन्नाच्या शोधात कधीही बाहेर जाऊ दिलं नाही. मी सैनिकांकडे गेले. कारण अन्न मिळवण्याचा हा एकमेव मार्ग होता. अन्नधान्य कारखान्यांच्या परिसरात सैनिक आहेत.' या महिलेला गेल्या वर्षी मे महिन्यात मांस प्रक्रिया करणाऱ्या एका कारखान्यात सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आलं होतं.
advertisement
सुदानमधल्या गृहयुद्धात देशाच्या सैन्याला निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसचा (आरएसएफ) सामना करावा लागला. गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच महिलांचा हा छळ सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या संघर्षाच्या काही दिवसांनंतर, सशस्त्र पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या उघड झाल्या. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. काही अंदाजानुसार मृतांची संख्या दीड लाख इतकी आहे. युद्धामुळे जगातलं सर्वांत वाईट विस्थापन संकट निर्माण झालं आहे. 11 दशलक्षहून अधिक जण बेघर झाले आहेत आणि देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे.
advertisement
आरएसएफ सैनिक त्यांच्या नियंत्रणाखालच्या भागात कशा प्रकारे महिलांचं लैंगिक शोषण करतात याच्या वेदनादायक कथा सांगण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आहेत. महिलांनी गार्डियनला सांगितलं, की सैनिकांनी रिकाम्या घरांमधल्या वस्तूंच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केली आहे.
एका महिलेनं सांगितलं, की सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर तिला रिकाम्या घरातून अन्न, स्वयंपाकघरातल्या वस्तू आणि परफ्यूम घेण्याची परवानगी देण्यात आली होती. ती म्हणाली, 'माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याचं वर्णन करता येणार नाही. माझ्या शत्रूशीदेखील असं घडू नये, अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या मुलांचं पोट भरायचं होतं म्हणून मी हे केलं.'
advertisement
शहरातल्या रहिवाशांनी दावा केला, की त्यांनी सैनिकांना अनेक महिलांना रिकाम्या घरांमध्ये आणताना पाहिलं आहे. ते महिलांना रांगेत उभं करतात आणि त्यातून आवडणारी महिला निवडतात.
एका रहिवाशानं सांगितलं, 'आमच्या लगतच्या परिसरात बाहेरून अनेक महिला येतात आणि रांगेत उभ्या असतात. कधीकधी किंचाळ्या ऐकू येतात; पण आम्ही काहीही करू शकत नाही.' महिलांचा आदर करणाऱ्या एका सैनिकाने सांगितलं, की त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना असं कृत्य करताना पाहिलं आहे. तो म्हणाला, 'या शहरात घडलेल्या पापांना क्षमा मिळू शकत नाही.'
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 11:32 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
पोट भरण्यासाठी सैनिकांसोबत लैंगिक संबंध, नकार दिला तर...महिलेनं सांगितलं भयाण वास्तव


