या देशात पसरला गूढ आजार, नाव त्याचं डिंगा डिंगा! महिला-लहान मुलांमध्ये पसरतोय वेगाने

Last Updated:

युगांडातील बुंडिबुग्यो जिल्ह्यात 'डिंगा डिंगा' नावाचा गूढ आजार आढळला आहे. महिलांना झटके, ताप, आणि अशक्तपणाचा सामना करावा लागत आहे. 300 रुग्ण नोंदवले गेले असून, उपचारासाठी अँटीबायोटिक्स दिले जात आहेत. वैज्ञानिक तपास सुरू आहे, मात्र कोणतेही मृत्यू नोंदले गेले नाहीत.

News18
News18
कोरोना महामारीनंतर एखाद्या गूढ आजाराची माहिती मिळाल्यास काळजी वाटणे साहजिक आहे. याच प्रकारे 'डिंगा डिंगा' नावाचा गूढ आजार सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. आफ्रिकेतील युगांडामध्ये या गूढ आजाराचा प्रादुर्भाव झाला असून, त्याच्या अनोख्या स्वरूपामुळे तो चर्चेत आला आहे. 'डिंगा डिंगा'चा अर्थ आहे 'नाचण्यासारख्या हालचाली'. हा आजार प्रामुख्याने युगांडाच्या बुंडिबुग्यो जिल्ह्यातील महिला आणि मुलींना बाधित करत आहे. यामुळे त्यांना शरीरात अनियंत्रित झटके येणे आणि चालण्यास अडचण निर्माण होणे याचा सामना करावा लागत आहे.
या आजारामुळे शेकडो लोक, विशेषतः महिला आणि मुलं, हादरले आहेत. अद्याप मृत्यूंची नोंद नाही, परंतु स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार हा आजार वेगाने पसरत आहे. आरोग्य अधिकारी या आजाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीरात नाचासारख्या हालचालींसह अतिशय झटके, उष्णतेसारखा ताप आणि तीव्र अशक्तपणा, काही प्रकरणांमध्ये लकवा झाल्यासारखे वाटणे, अशी लक्षणं आहेत. बाधित व्यक्तींना चालणे अशक्यप्राय वाटते, कारण अनियंत्रित झटक्यांमुळे हालचाली कठीण होत आहेत.
advertisement
18 वर्षीय पेशंट पेशन्स कटुसीमे यांनी या आजाराबाबत आपला अनुभव सांगितला. त्यांनी म्हटले की, "माझं शरीर सतत हलत होतं, जरी मी लकवाग्रस्त होते तरी. मी चालायचा प्रयत्न केला की, शरीर अनियंत्रितपणे थरथरायचं. ही खूप त्रासदायक गोष्ट होती. मात्र, मला बुंडिबुग्यो हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आता मी ठीक आहे." सध्या 'डिंगा डिंगा' हा आजार फक्त बुंडिबुग्यो जिल्ह्यातच दिसून आला असून सुमारे 300 प्रकरणं नोंदली गेली आहेत. पहिल्यांदा हा आजार 2023 च्या सुरुवातीस समोर आला. सध्या आरोग्य प्रयोगशाळांमध्ये या आजाराचं कारण शोधलं जात आहे. नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
advertisement
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कियिता ख्रिस्तोफर यांनी सांगितलं की, 'डिंगा डिंगा'साठी स्थानिक आरोग्य पथकांकडून देण्यात येणाऱ्या अँटीबायोटिक्स औषधांचा चांगला परिणाम होत आहे. काही रुग्ण लक्षणं कमी करण्यासाठी वनौषधी उपचारांचा अवलंब करत आहेत, परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. "वनौषधींनी या आजारावर उपचार होत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. विशिष्ट औषधांचा वापर करून रुग्ण सहसा आठवड्याभरात बरे होतात," असं डॉ. ख्रिस्तोफर यांनी सांगितलं.
advertisement
युगांडा 'डिंगा डिंगा'शी झगडत असताना, शेजारील देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (DRC) 'डिसीज एक्स' नावाच्या आणखी एका गूढ आजाराला तोंड देत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस या आजारामुळे 406 प्रकरणं आणि 79 मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. लहान मुलं, विशेषतः पाच वर्षाखालील वयोगटातील मुलं, या आजाराने सर्वाधिक प्रभावित होत आहेत. ताप, डोकेदुखी, खोकला आणि अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि नाक वाहणं, गंभीर प्रकरणांमध्ये कुपोषण आणि अशक्तपणा, डिसीज एक्सची प्रमुख लक्षण आहेत. सध्याच्या घडीला युगांडा आणि इतर आफ्रिकन देश या आजारांशी लढा देत आहेत. आरोग्य विभागांनी वेळीच उपचार करून या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
या देशात पसरला गूढ आजार, नाव त्याचं डिंगा डिंगा! महिला-लहान मुलांमध्ये पसरतोय वेगाने
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement