गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सोमनाथ स्वाभिमान पर्वात भूपेंद्र भाई पटेल, हर्ष संघवी, जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, राजेश भाई सहभागी.
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तडफदार युवा उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जी, गुजरात सरकारमधील मंत्री जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, खासदार राजेश भाई, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत , त्यांनाही माझ्याकडूनही जय सोमनाथ।
मित्रहो,
ही वेळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे, हा उत्सव अद्भुत आहे, एकाबाजूला स्वयं देवाधिदेव महादेव, दुसरीकडे सागराच्या विशाल लाटा, सूर्याची ही किरणे, हा मंत्रोच्चार, हे श्रद्धेने भारलेले दिव्य वातावरण, इथे उपस्थित भगवान सोमनाथ यांचे भक्त , यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला आहे. आणि मी हे माझे मोठे सौभाग्य मानतो की सोमनाथ मंदिर न्यासाचा अध्यक्ष म्हणून मला सोमनाथ स्वाभिमान पर्व मध्ये सक्रिय सेवेची संधी मिळाली आहे. मागून काही वेगळे आवाज येत आहेत, जरा ते बंद करा. 72 तास चाललेला अखंड मंत्रोच्चार, आणि मी काल संध्याकाळी पाहिले , एक हजार ड्रोन्स द्वारे वैदिक गुरुकुलच्या एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती , सोमनाथच्या एक हजार वर्षांच्या गाथेचे प्रदर्शन, आणि आज 108 अश्वांसह मंदिरापर्यंत शौर्य यात्रा, मंत्र आणि भजनांची हे अद्भुत सादरीकरण सगळे काही मंत्रमुग्ध करणारे आहे. ही अनुभूति शब्दांमध्ये मांडता येणार नाही, ती केवळ काळच संकलित करू शकतो. या आयोजनात अभिमान आहे, प्रतिष्ठा आहे , गौरव आहे आणि यात ज्ञान देखील आहे. यात वैभवाचा वारसा आहे. यात अध्यात्माची अनुभूती आहे. अनुभव आहे, आनंद आहे, आत्मीयता आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाधिदेव महादेवाचे आशीर्वाद आहेत. चला माझ्यासोबत म्हणा, नम: पार्वती पतये….हर हर महादेव।
advertisement
मित्रहो,
आज, मी तुमच्याशी बोलत असताना, माझ्या मनात वारंवार हा प्रश्न येत आहे की, बरोबर एक हजार वर्षांपूर्वी, या ठिकाणी आता जिथे तुम्ही बसला आहात, त्याच ठिकाणी वातावरण कसे असेल? इथे जे उपस्थित आहेत, त्यांच्या पूर्वजांनी, तुमच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी, आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. आपल्या श्रद्धेसाठी, आपल्या विश्वासासाठी , आपल्या महादेवासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. हजार वर्षांपूर्वी , जेव्हा त्या क्रूर लोकांना वाटत होते कि ते जिंकले आहेत. मात्र आज एक हजार वर्षांनंतरही, सोमनाथ महादेवाच्या मंदिरावर फडकत असलेला ध्वज संपूर्ण सृष्टीला हिंदुस्तानच्या सामर्थ्याची आणि क्षमतेची जाणीव करुन देत आहे. प्रभास पाटनच्या मातीचा प्रत्येक कण शौर्य, धाडस आणि वीरतेचा साक्षीदार आहे. सोमनाथचे स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी अगणित शिवभक्तांनी , संस्कृतीच्या उपासकांनी , संस्कृतीच्या ध्वजधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आज सोमनाथ स्वाभिमान पर्व निमित्त सर्व[थम मी त्या प्रत्येक वीर-वीरांगना यांना वंदन करतो, ज्यांनी सोमनाथचे संरक्षण आणि मंदिराची पुनर्बांधणी हे आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. आपले सर्वस्व देवाधिदेव महादेवाला अर्पण केले.
advertisement
बंधू-भगिनींनो,
प्रभास पाटनचा हा परिसर भगवान शंकराचा तर आहेच , याचे पावित्र्य भगवान श्रीकृष्णाशीही जोडलेले आहे. महाभारताच्या काळात पांडवांनीही या पवित्र स्थळी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच हा समारंभ म्हणजे भारतातील अगणित आयामांना अभिवादन करण्याची एक संधी आहे. सोमनाथ स्वाभिमान यात्रेने हजार वर्ष पूर्ण केल्याचा आणि 1951 मध्ये या मंदिराच्या पुनर्निमितीला पंच्याहत्तर पूर्ण होत असल्याचा भाग्यशाली योग आज जुळून आला आहे. मी जगभरातील कोट्यवधी भक्तांना सोमनाथ स्वाभिमान पर्व निमित्त शुभेच्छा देतो.
advertisement
मित्रहो,
सोमनाथ स्वाभिमान पर्व, 1000 वर्षांपूर्वी झालेल्या विध्वंसाचे स्मरण नव्हे तर हजार वर्षांच्या प्रवासाचे पर्व आहे. तसेच ते आपल्या भारताचे अस्तित्त्व आणि अभिमानाचे पर्व आहे. कारण आपल्याला प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक टप्प्यावर सोमनाथ आणि भारत यांच्यात अद्वितीय साम्य दिसून येते. जसे सोमनाथचा विध्वंस करण्यासाठी एक नाही, असंख्य प्रयत्न झाले, तसेच परकीय आक्रमकांनी शतकानुशतके भारताचा नाश करण्याचासातत्याने प्रयत्न केला. पण ना सोमनाथ नष्ट झाले , ना भारत, कारण भारत आणि त्याची श्रद्धास्थाने एकमेकांमध्ये समाहित आहेत.
advertisement
मित्रहो,
तुम्ही जरा त्या इतिहासाची कल्पना करा, एक हजार वर्षांपूर्वी सन 1026 मध्ये, सर्वप्रथम गझनीने सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले , त्याला वाटले की त्याने सोमनाथचे अस्तित्व मिटवले.मात्र काही वर्षांच्या आतच सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. बाराव्या शतकात राजा कुमारपालाने मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला. मात्र तेराव्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दीन खिलजीने पुन्हा एकदा सोमनाथ मंदिरावर हल्ला करण्याचे दुःसाहस केले . मात्र जालोरच्या राजाने खिलजीच्या सैन्याविरूद्ध शौर्याने लढा दिला. त्यानंतर चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला जुनागढच्या राजाने मंदिराचे वैभव पुनर्स्थापित केले. चौदाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांमध्ये मुझफ्फर खानने सोमनाथ मंदिरावर पुन्हा हल्ला केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. पंधराव्या शतकामध्ये सुलतान अहमद शाहने मंदिराचा विध्वंस कऱण्याचा प्रयत्न केला आणि त्याच शतकात त्याचा नातू सुलतान महमूद बेगडा याने सोमनाथवर हल्ला करून मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महादेवाच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे मंदिर पुन्हा एकदा पुनरुज्जिवित झाले. सतराव्या आणि अठराव्या शतकामध्ये औरंगजेबाचे राज्य आले. त्याने सोमनाथ मंदिर उद्धवस्त करत पुन्हा एकदा त्याचे मशिदीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी नव्याने मंदिर उभारून सोमनाथ मंदिर पुन्हा उभे केले. म्हणजेच सोमनाथ मंदिराचा इतिहास विनाश आणि पराभवाचा इतिहास नाही तर तो विजय आणि पुनर्बांधणीचा आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा आहे, आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे. आक्रमणकर्ते येत राहिले, धार्मिक दहशतीचे नवे हल्ले होत राहिले, मात्र प्रत्येक युगात सोमनाथ मंदिराची सातत्याने पुनर्स्थापना होत राहिली . शतकानुशतकांचा संघर्ष, दीर्घकाळ सुरू असलेला प्रतिकार, इतके महान धैर्य , पुनर्बांधणीतील आत्यंतिक सहनशीलता, हे सामर्थ्य , आपल्या संस्कृतीवर असा विश्वास आणि अशी श्रद्धा , जगाच्या इतिहासात असे उदाहरण सापडणे कठीण आहे. जरा मला उत्तर द्या, आपण आपल्या पूर्वजांच्या शौर्यांचे पुन्हा स्मरण करायला हवे की नाही? आपल्या पूर्वजांच्या पराक्रमातून आपण प्रेरणा घ्यायला हवी की नको ? असा कोणी पुत्र असतो , असा कोणी मुलगा असतो जो आपल्या पूर्वजांचे पराक्रम विसरण्याचे नाटक करतो?
advertisement
बंधू-भगिनींनो,
जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंत, तमाम आक्रमक सोमनाथवर हल्ला करत होते, तेव्हा त्यांना वाटले की, त्यांच्या तलवारी सनातन सोमनाथ मंदिरावर विजय मिळवत आहेत, मात्र या धर्माधांना याची जाणीव नव्हती की, जे सोमनाथ त्यांना नष्ट करायचे आहे , त्याच्या नावातच ‘सोम’ म्हणजे अमृत आहे. विष प्राशनानंतरही अमर राहण्याची कल्पना आहे. सोमनाथ मंदिरात सदाशिव महादेवाच्या रूपाने चैतन्यशक्ती वास करते, जी कल्याणकारी देखील आहे आणि ‘प्रचंड तांडव शिव’ हा शक्तीचा स्रोत देखील आहे.
advertisement
बंधू-भगिनींनो ,
सोमनाथमध्ये विराजमान महादेव, त्यांचे एक नाव मृत्युंजय देखील आहे. मृत्युंजय, ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे, जो काळाचे प्रतीक आहे. यतो जायते पाल्यते येन विश्वं, तमीशं भजे लीयते यत्र विश्वम! म्हणजे , ही सृष्टी त्याच्यापासून निर्माण होते आणि त्याच्यातच विलीन होते . आपण मानतो – त्वमेको जगत् व्यापको विश्व रूप! म्हणजे , संपूर्ण विश्व शिवाने व्यापले असून, प्रत्येक कणात शंकराचा वास आहे . कारण शंकराची अगणित रूपे आहेत, त्या रूपांचा कोणीही नाश करू शकत नाही. आपण ते लोक आहोत जे सजीवांमध्येही शंकराला पाहतात . त्यामुळे त्यांच्यावरचा आपला विश्वास कोणी कसा डळमळीत करू शकेल?
आणि मित्रांनो,
काळाचे चक्र असे आहे की सोमनाथ मंदिराचा विध्वंस करण्याच्या उद्देशाने आलेल्या कट्टर धार्मिक लोकांची नावे आज इतिहासाच्या काही पानांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. सोमनाथ मंदिर मात्र विशाल समुद्राच्या त्याच किनाऱ्यावर गगनचुंबी धर्म पताका घेऊन अद्यापही ताठपणे उभे आहे. सोमनाथाचा कळस जणू काही- चंद्रशेखरम आश्रये मम किम करिश्यति वै यम:! – म्हणजे “मी चंद्रशेखर शिवाच्या आश्रयाला असल्यामुळे; स्वतः काळ देखील आला तरी मला काय करू शकतो?,” असा मोठ्या आवाजात उद्घोष करत आहे.
मित्रांनो,
सोमनाथ स्वाभिमान पर्व इतिहासाचे गौरवशाली पर्व तर आहेच, शिवाय एक कालातीत प्रवास भविष्यासाठी जिवंत बनविण्याचे ते एक माध्यमही आहे. आपण या संधीचा आपले अस्तित्व आणि आपली ओळख आणखी दृढ करण्यासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही तर पाहताच आहात, जर कोणत्या देशामध्ये कोणत्याही गोष्टीची काही शे वर्षांची परंपरा असेल, तर तो देश ती आपली ओळख म्हणून ती जगापुढे सादर करतो. तसेच भारतामध्ये सोमनाथ सारखे हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले पवित्र स्थान आहे. हे स्थान आपले सामर्थ्य, प्रतिकार आणि परंपरा यांचे प्रतीक राहिले आहे. परंतु, दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीची मानसिकता असलेल्या लोकांनी त्या परंपरेपासून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. तो इतिहास विस्मरणात जावा यासाठी कुटील प्रयत्न केले गेले. आपल्याला माहितच आहे की, सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी देशाने कशा-कशाचे बलिदान दिले आहे. रावल कान्हडदेव यांच्यासारख्या शासकांचे प्रयत्न, वीर हमीरजी गोहिल यांचा पराक्रम, वेगडा भिल्ल यांचे शौर्य, अशा कितीतरी नायकांचा इतिहास सोमनाथ मंदिराशी निगडित आहे. पण, दुर्दैवाने याला कधी म्हणावे तसे महत्त्व दिले गेले नाही. उलट, आक्रमणाच्या इतिहासालाही काही इतिहासतज्ज्ञांनी आणि राजकीय नेत्यांनी रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला. त्याला केवळ सामान्य लूट म्हणत धार्मिक उन्मादाच्या मानसिकतेवर पांघरूण घालण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली गेली. सोमनाथ मंदिर फक्त एकदाच नाही तर, पुन्हा-पुन्हा फोडले गेले. सोमनाथ मंदिरावरील आक्रमण जर केवळ आर्थिक लूट करण्यासाठी होते, तर हजार वर्षांपूर्वी, पहिल्या मोठ्या लुटीनंतरच ते थांबले असते. मात्र असे झाले नाही. सोमनाथाच्या पवित्र विग्रहाचे भंजन करण्यात आले. पुनःपुन्हा मंदिराचे स्वरुप बदलण्याचे प्रयत्न झाले. आणि आपल्याला शिकवलं गेलं की सोमनाथ मंदिर लुटण्यासाठी त्याचा विध्वंस करण्यात आला. अत्याचार आणि दहशतीचा खरा क्रूर इतिहास आपल्यापासून लपविण्यात आला.
मित्रांनो,
आपल्या धर्माशी प्रामाणिक असलेली कोणतीही व्यक्ती अशा जहाल कडव्या विचारांचे समर्थ करणार नाही. उलटपक्षी लांगूलचालनाचा मक्ता घेतलेल्यांनी कायमच अशा कडव्या विचारसरणीपुढे कायमच गुडघे टेकले आहेत. जेव्हा भारत पारतंत्र्याच्या शृंखलांतून मुक्त झाला, तेव्हा सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला, तेव्हा त्यांनाही त्यापासून थोपविण्याचा प्रयत्न केला गेला. 1951 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेन्द्र प्रसाद यांच्या इथे येण्यावरही आक्षेप घेतला गेला. त्या वेळेस सौराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेले आपले जामसाहब महाराजा दिग्विजय सिंह जी पुढे झाले होते. जमीन संपादित करण्यापासून ते सुरक्षा व्यवस्थेपर्यंत, त्यांनी राष्ट्रीय गौरवाला सर्वोच्च स्थान दिले होते. जाम साहेबांनी त्याकाळी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. तसेच त्यांनी ट्रस्टचे पहिले अध्यक्ष या नात्याने मोठी जबाबदारी पार पाडली.
बंधू भगिनींनो,
दुर्दैवाने, आजही आपल्या देशात सोमनाथ मंदिराची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी विरोध केला, त्या शक्ती अस्तित्वात आहेत, त्या पूर्णपणे सक्रिय आहेत. आज तलवारींच्या ऐवजी अन्य काही कुटील प्रयत्नांद्वारे भारताच्या विरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत. आणि म्हणूनच आपल्याला अधिक सावध राहावे लागणार आहे. आपण शक्तिशाली बनणे आवश्यक आहे. आपल्यात फूट पाडण्याची कारस्थाने रचणाऱ्या प्रत्येक ताकदीवर आपल्याला मात करायची आहे, त्यासाठी आपण एक राहिले पाहिजे, एकजूट कायम ठेवली पाहिजे
मित्रांनो,
जेव्हा आपण आपल्या श्रद्धेशी जोडलेले असतो, आपल्या मुळांना धरून ठेवलेले असते, पूर्णपणे स्वाभिमान बाळगून आपली परंपरा जतन करत असतो, आपल्या परंपरेबद्दल सजग असतो, तेव्हा आपल्या सभ्यतेची मुळेही अधिक खोलवर रुजत असतात. आणि म्हणूनच, मागील एक हजार वर्षांचा प्रवास. आपल्याला पुढील एक हजार वर्षांकरिता तयार राहण्यासाठी प्रेरित करतो.
मित्रांनो,
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या ऐतिहासिक प्रसंगी, मी भारतासाठीचे एक हजार वर्षांचे विशाल स्वप्न सर्वांसमोर मांडले होते. मी ‘देव से देश’ हा दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याबद्दल बोललो होतो. आज देशाचे सांस्कृतिक पुनर्जागरण देशाच्या कोट्यवधी नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण करत आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात विकसित भारताबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. आज 140 कोटी भारतीयांमध्ये भविष्यातील उद्दिष्टांबाबत निर्धाराची भावना आहे. भारताचा गौरव नव्या उंचीवर पोहोचेल, आपण गरिबीविरुद्धच्या आपल्या लढ्यात यशस्वी होऊ, आपण विकासाची नव नवीन शिखरे गाठू अशी खात्री वाटत आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे हे पहिले लक्ष्य आहे, त्यानंतरच्या पुढील प्रवासासाठी देश आता सिद्ध झाला आहे आणि सोमनाथ मंदिराची ही ऊर्जा, आपल्या या संकल्पांना आशीर्वाद देत आहे.
मित्रांनो,
आजचा भारत परंपरेकडून विकासाकडे जाण्याची प्रेरणा घेऊन पुढे जात आहे. सोमनाथमध्ये विकास भी विरासत भी ही भावना निरंतर आकारास येत आहे. आज एकीकडे सोमनाथ मंदिराचा सांस्कृतिक विस्तार, सोमनाथ संस्कृत विद्यापीठाची स्थापना, माधवपूर मेळ्याची लोकप्रियता आणि त्याचे बहुरंगी स्वरुप यामुळे आपली परंपरा आणखी दृढ होत आहे. गिरमधील सिंहांचे संरक्षण केले जात असल्याने या भागातील निसर्गाबद्दलचे आकर्षण वाढत आहे. त्याच वेळी, प्रभास पाटण भागाच्या विकासाचे नवे पैलू देखील समोर आणले जात आहेत. केशोद विमानतळाचा विस्तार करण्यात येत आहे. यामुळे देश-परदेशातून येणाऱ्या भाविकांना थेट सोमनाथला पोहोचणे शक्य होईल. अहमदाबाद ते वेरावळ वंदे भारत ट्रेन सुरु झाल्याने यात्रेकरू आणि पर्यटकांचा प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. याच भागात यात्राधाम सर्किटही विकसित करण्यात येत आहे. म्हणजेच आजचा भारत श्रद्धेची भावना जपण्यासोबतच पायाभूत सुविधा, संपर्क सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला भविष्यासाठीही सक्षम बनवला जात आहे.
मित्रांनो,
आपल्या सभ्यतेने आपल्याला कायमच कधी कोणाला पराजित करण्याचा नाही, तर जीवनात संतुलन राखण्याचा संदेश दिला आहे. आपल्याकडे श्रद्धेचा मार्ग आपल्याला द्वेषाकडे घेऊन जात नाही, आपल्या इथे ताकद आपल्यामध्ये विनाश करण्याचा अहंकार निर्माण करत नाही. सोमनाथसारख्या तीर्थस्थानांनी आपल्याला शिकविले आहे की, सृजनाचा प्रवास दीर्घकाळ चालणारा असतो, परंतु तोच शाश्वत असतो, चिरंजीव असतो. तलवारीच्या जोरावर कधीही मने जिंकता येऊ शकत नाहीत, ज्या सभ्यता इतरांना नामशेष करून पुढे जाऊ पाहतात , त्या कालांतराने स्वतःच लोप पावतात. म्हणूनच भारताने दुसऱ्याला हरवून कसे जिंकता येते हे नाही तर मने जिंकून कसे जगावे हे जगाला शिकवले. या विचाराची आज जगाला गरज आहे. सोमनाथ मंदिराची हजार वर्षांची गाथा संपूर्ण मानवतेला ही शिकवण देत आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया, आपण विकासाच्या दिशेने पुढे जाऊ, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करू, आणि त्यासोबतच आपला गतकाळ आणि आपली परंपरा यांचीही जपणूक करू. आपण आधुनिकतेचा अंगिकार करण्यासोबतच आपली चेतनाही जतन करू. चला, सोमनाथ स्वाभिमान पर्वासारख्या उपक्रमांच्या आयोजनांपासून प्रेरणा घेऊन विकसित होण्याच्या मार्गावरून वेगाने वाटचाल करूया. प्रत्येक आव्हानावर मात करत आपले ध्येय गाठूया आणि हा कार्यक्रम आता कुठे फक्त सुरू होतो आहे. आपण या घटनेला हजार वर्षे पूर्ण झाल्याची देशाच्या काना-कोपऱ्यात आठवण करून देण्याची गरज आहे. जगाला आपल्या परंपरेचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला 75 वर्षांचे हे नवे पर्व देखील साजरे करायचे आहे, आणि आपण मे, 2027 पर्यंत हे पर्व साजरे करायचे आहे, जन-मन जागे करत राहूया, जागृत झालेला देश स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे चालत राहो, अशा सदिच्छेसह, पुन्हा एकदा समस्त देशवासीयांना मी खूप-खूप शुभेच्छा व्यक्त करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 4:51 PM IST










