पं. नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ‘स्टार्टअप इंडिया’च्या दशपूर्तीनिमित्त कार्यक्रमाला केले संबोधित

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये स्टार्टअप इंडिया दशकपूर्ती कार्यक्रमात भारतातील 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स, 125 युनिकॉर्न्स आणि महिला नेतृत्वाचे कौतुक केले.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त, नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमामध्‍ये  बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज प्रत्येकजण एका विशेष, म्हणजेच राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या निमित्ताने एकत्र आला आहे, आणि हे सर्व स्टार्टअप संस्थापक आणि नवोन्मेषक, जे नवीन आणि विकसनशील भारताचे भविष्य आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. ते म्हणाले की, काही वेळापूर्वीच त्यांनी कृषी, फिनटेक, गतिशीलता, आरोग्य आणि शाश्वतता या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या काही सहभागींशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पनांनी  आपण  प्रभावित झालो आहोत.त्याचबरोबर  त्यांचा आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा जाणून  आपण  अधिक प्रभावित झालो.  स्टा’र्टअप इंडिया’ 10 वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे स्मरण करून, मोदी यांनी या उपक्रमाच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि तरुणांना भेटून आपल्याला आनंद झाल्याचे ते म्हणाले. भारतातील युवा वर्ग वास्तवातील समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, हा सर्वात महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगून, मोदी यांनी नवी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या नवोन्मेषकांचे कौतुक केले.
स्टार्ट अप इंडिया, आज दहा वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे आणि हा प्रवास केवळ एका सरकारी योजनेची यशोगाथा नाही, तर लाखो स्वप्नांचा आणि असंख्य कल्पनांच्या पूर्ततेचा प्रवास आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दहा वर्षांपूर्वी वैयक्तिक प्रयत्नांना आणि नवोन्मेषाला फारसा वाव नव्हता, मात्र त्या परिस्थितीला आव्हान देण्यात आले आणि स्टार्टअप इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आला, त्यामुळे तरुणांना खुले आकाश मिळाले आणि आज त्याचे परिणाम देशासमोर आहेत, असे त्यांनी सांगितले. केवळ 10 वर्षांत स्टार्टअप इंडिया मिशन ही एक क्रांती बनली असून, भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयाला आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. दहा वर्षांपूर्वी देशात 500 पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, आज ही संख्या 2 लाखांहून अधिक झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
advertisement
2014 मध्ये भारतात केवळ 4 युनिकॉर्न होते, तर आज सुमारे 125 सक्रिय युनिकॉर्न असून जग या यशोगाथेची आश्चर्याने दखल घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यात जेव्हा भारताच्या स्टार्टअप प्रवासाची चर्चा होईल, तेव्हा आज या सभागृहात उपस्थित असलेले अनेक युवा स्वतः एक आदर्श उदाहरण बनलेले असतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. स्टार्टअप इंडियाची गती सतत वाढत असून, आजचे स्टार्टअप्स युनिकॉर्न बनत आहेत, आयपीओ काढत आहेत आणि अधिकाधिक रोजगार निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले. केवळ 2025 या एकाच वर्षात सुमारे 44,000 नवीन स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून, स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या प्रारंभापासूनची ही कोणत्याही एका वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे असे ते म्हणाले. या आकडेवारीतून भारताचे स्टार्टअप्स रोजगार, नवोन्मेष आणि प्रगतीला कशी गती देत आहेत याचीच साक्ष मिळते, असे त्यांनी नमूद केले.
advertisement
स्टार्टअप इंडियाने देशात एक नवीन संस्कृती निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. पूर्वी नवीन व्यवसाय आणि उपक्रम प्रामुख्याने मोठ्या औद्योगिक घराण्यांतील वारसांकडूनच सुरू केले जात असत, कारण केवळ त्यांनाच सुलभतेने निधी आणि इतर सहकार्य मिळत होते, तर त्याचवेळी बहुतांश मध्यमवर्गीय आणि गरीब मुलांसाठी व्यवसाय करणे हे केवळ एक स्वप्नच असायचे असे ते म्हणाले. मात्र स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाने ही मानसिकता बदलली आहे, आता दुस-या  आणि तिस-या स्तरावरील  शहरांमधील, अगदी खेड्यांमधील युवा वर्गही स्वतःचे स्टार्टअप सुरू करत आहेत, तळागाळातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. या युवा वर्गातील समाज आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची ही भावना आपल्यासाठी अत्यंत मोलाची आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
देशाच्या कन्यांनीही या परिवर्तनात मोठी भूमिका बजावली असल्याची बाब पंतप्रधानांनी नमूद केली. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी 45 टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार आहे, असे ते म्हणाले.महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपना निधी पुरवठा करण्याऱ्या सर्वात मोठ्या परिसंस्थेच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सर्वसमावेशक वेगामुळे भारताची क्षमतेला अधिक बळकटी मिळत असल्याचे ते म्हणाले.
advertisement
आज देश स्टार्टअप क्रांतीमध्ये आपले भविष्य पाहत असल्याचे ते म्हणाले. स्टार्टअप्सना इतके महत्त्व का दिले जाते,  असे कोणी विचारत असेलत तर त्याची अनेक उत्तरे असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, भारत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे आणि नवीन क्षेत्र उदयाला येत आहेत, ही प्रत्येक बाब वास्तव आहे असे त्यांनी सांगितले. भारताचा युवा वर्ग केवळ सुरक्षित कोशात अडकून राहण्याला, जुनाट वाटांवरूनच मार्गक्रमण करत राहण्याला नकार देत, स्वतःचे नवे वेगळे मार्ग घडवू इच्छितात, नवी उद्दिष्टे गाठू इच्छितात, स्टार्टअपमधल्या या जिद्दीने आपल्या मनाला सर्वाधिक स्पर्ष केला आहे असे त्यांनी सांगितले. अशी नवीन उद्दिष्टे केवळ कठोर परिश्रमानेच साध्य होतात असे ते म्हणाले. केवळ इच्छा बाळगून नाही तर प्रत्यक्ष कृतीतूनच कार्य सिद्धीस जाते या उक्तीचेही त्यांनी यानिमित्ताने स्मरण केले. धाडस ही उद्योजकतेची पहिली अट असल्याचे ते म्हणाले. युवा वर्गाने या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी दाखवलेल्या धाडसाची तसेच पत्करलेलेल्या धोक्याची दखल  त्यांनी घेतली .  यापूर्वी देशात जोखीम घेण्यापासून पारावृत्त केले जायचे, मात्र आता जोखीम घेणे ही मुख्य प्रवाहातील गोष्ट बनली आहे. ज्या व्यक्ती दरमहिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या पलीकडचा विचार करतात, त्यांची स्वीकारार्हता तर वाढतेच त्यासोबतच त्यांच्याबद्दलचा आदरभावही वाढतो हे वास्तव त्यांनी नमूद केले. कधीकाळी ज्या कल्पना उपेक्षित ठेवल्या गेल्या होत्या, आज त्याच कल्पना फॅशनेबल बनू लागल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
जोखीम पत्करण्यावर आपला जास्त भर असल्याचे आणि ही आपली जुनी सवय असल्याचे मोदी यांनी नमूद केले. जी कामे कोणी करायला तयार नव्हते, जे प्रश्न आधीच्या सरकारांनी, निवडणुका किंवा सत्ता गमावण्याच्या भीतीने दशकानुदशके टाळले अशी मोठी राजकीय जोखीम म्हणून ओळखली जाणारी कामे करण्याची जबाबदारी आपण नेहमी स्वतःची मानली, असे त्यांनी सांगितलं. एखादी गोष्ट राष्ट्रासाठी आवश्यक असेल तर त्यासाठी कुणीतरी जोखीम घ्यायलाच हवी आणि तोटा झाला तर तो आपला असेल पण त्याचा फायदा लाखो कुटुंबांपर्यंत पोहोचेल, असं नवोन्मेषकांप्रमाणे आपणही मानतो असे ते म्हणाले.
advertisement
गेल्या 10 वर्षांत देशात नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी परिस्थिती तयार झाली आहे, असे त्यांनी सांगितले. शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करण्यात आल्यामुळे मुलांमध्ये नवोन्मेषाची भावना जागी झाली. हॅकाथॉनमुळे तरुणांना राष्ट्रीय समस्या सोडवायला प्रोत्साहन मिळाले. संसाधनांच्या अभावामुळे कल्पना मरून जाऊ नयेत म्हणून इन्क्युबेशन केंद्रे सुरू झाली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जटिल नियम, लांबलचक मंजुरी प्रक्रिया आणि इन्स्पेक्टर राजची भीती म्हणजे सरकारी निरीक्षकांच्या भीतीखाली चालणारी व्यवस्था हे नवोन्मेषासाठी मोठे अडथळे होते, म्हणूनच त्यांच्या सरकारने विश्वास आणि पारदर्शकतेचे वातावरण तयार केले, असे मोदी यांनी सांगितले. जन विश्वास कायद्याखाली 180 पेक्षा जास्त तरतुदी अपराधमुक्त करण्यात आल्या. म्हणजे गुन्हा म्हणून न मानता फक्त नियमभंग म्हणून त्याकडे पाहण्यात येऊ लागले. नवोन्मेषकांचा मौल्यवान वेळ त्यामुळे वाचतो आणि ते खटल्यांऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. स्टार्टअप्सना आता स्वतःच नियम पाळल्याचे प्रमाण द्यायची मुभा आहे, त्यामुळे वेळ वाचतो आणि कामकाज सोपे होते. तसेच दुसऱ्या कंपनीत सामील होणे किंवा व्यवसाय बंद करणे यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया आधीपेक्षा खूप सोप्या झाल्या आहेत. स्टार्टअप इंडिया ही फक्त एक योजना नाही, ती विविध क्षेत्रांना नव्या संधींनी जोडणारी इंद्रधनुष्य दृष्टी आहे, असे मोदी यांनी ठामपणे सांगितलं. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्टार्टअप्सना आधी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची कल्पनाही करता येत नव्हती, पण iDEX – संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनेमुळे धोरणात्मक क्षेत्रांमध्ये नवे खरेदी मार्ग खुले झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. अवकाश क्षेत्रात आधी खासगी सहभाग नव्हता, आता हे क्षेत्र त्यासाठी खुले झाले आहे आणि जवळपास 200 स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत आणि जागतिक मान्यता मिळवत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आधीचे नियम ड्रोन क्षेत्राला अडथळा ठरत होते, पण सुधारणा आणि विश्वासामुळे आता या क्षेत्रात प्रगती आणि नवे प्रयोग सुरू झाले आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. जेममुळे लहान व्यवसाय आणि स्टार्टअप्सना सरकारी खरेदीत भाग घेऊन मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचता येते. जवळपास 35,000 स्टार्टअप्स आणि लहान व्यवसाय यात सामील झाले आहेत. त्यांना सुमारे 5 लाख ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यांची किंमत अंदाजे 50,000 कोटी रुपये आहे. स्टार्टअप्स त्यांच्या यशामुळे प्रत्येक क्षेत्रात विकासाची नवी कवाडे उघडत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
भांडवल नसल्यास चांगल्या कल्पना बाजारात पोहोचत नाहीत, म्हणून सरकारने नवोन्मेषकांना सहज वित्तपुरवठा मिळावा यावर भर दिला आहे, असे ते म्हणाले. स्टार्टअप्ससाठी सरकारने फंड ऑफ फंड्सद्वारे 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. तसेच स्टार्टअप इंडिया सीड फंड, ईन-स्पेस सीड फंड आणि निधी सीड सपोर्ट प्रोग्रॅम यांसारख्या योजनांमधून त्यांना सुरुवातीचं भांडवल मिळतं. कर्जपुरवठा सोपा व्हावा म्हणून क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली आहे, ज्यामुळे तारण नसतानाही स्टार्टअप्सना कर्ज मिळू शकते.
आजचे संशोधन हे उद्याची बौद्धिक संपदा होते यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की याला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख कोटी रुपये तरतुदीची संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना लागू केली असून या उदयोन्मुख क्षेत्रांमधील दीर्घकालीन गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी डीप टेक फंड ऑफ फंडस् योजना सुरु केली आहे. पंतप्रधानांनी आर्थिक सुरक्षा आणि धोरणात्मक स्वायत्तता यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन संकल्पनांवर कार्य करुन भविष्यासाठी सज्ज होण्याच्या  आवश्यकतेवर भर दिला आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण दिले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीत आघाडीवर असणाऱ्या राष्ट्रांना अधिक लाभ होणार आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतासाठी ही जबाबदारी स्टार्टअप्सची आहे. भारत फेब्रुवारी 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद आयोजित करणार असून युवकांसाठी ही मोठी संधी असेल, असे पंतप्रधान म्हणाले.  त्यांनी उच्च संगणकीय खर्चासारख्या आव्हानांची नोंद घेतली, मात्र भारतात  एआय मिशनच्या माध्यमातून त्यासाठी उपाय प्रदान केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. लहान स्टार्टअप्सना मोठे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी  38,000 पेक्षा अधिक जीपीयू (GPUs) जोडण्यात आले आहेत  आणि भारतीय प्रतिभेने भारतीय सर्व्हरवर देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित होईल याची खात्री केली जात आहे. सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स, ग्रीन हायड्रोजन आणि इतर क्षेत्रांमध्ये देखील अशाच प्रकारच्या प्रयत्नांवर काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.
भारताची महत्त्वाकांक्षा केवळ सहभागापुरती मर्यादित नसावी तर देशाने जागतिक नेतृत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवावे असे सांगत पंतप्रधानांनी स्टार्टअप्सना नवीन संकल्पनांवर आणि प्रश्न सोडवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षात भारताने डिजिटल स्टार्टअप्स आणि सेवा क्षेत्रातील स्टार्टअप्स मध्ये उत्तम कामगिरी केली असून आता उत्पादकता क्षेत्राला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करण्याचे आणि वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक संकल्पनांनी भविष्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन त्यांनी केले.  केंद्र सरकार सर्वप्रकारे स्टार्टअप्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची ग्वाही देत पंतप्रधानांनी भारताच्या भविष्याला आकार देणारे त्यांचे धाडस, विश्वास आणि नवोन्मेष यांच्यावर त्यांनी गाढ विश्वास व्यक्त केला. गेल्या दहा वर्षांनी राष्ट्राच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत आता आगामी दशक भारतासाठी नवीन स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाने समृद्ध होत जगाचे नेतृत्त्व करण्यासाठी सिद्ध होण्याचे आहे असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
नवोन्मेषाचे संवर्धन, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, तसेच भारताला नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणाऱ्या राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या हेतूने, पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2016 रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ हा परिवर्तनकारी राष्ट्रीय उपक्रम सुरू केला.
मागील दशकात स्टार्टअप इंडिया उपक्रम भारताच्या आर्थिक आणि नवोन्मेषात्मक संरचनेचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. या उपक्रमामुळे संस्थात्मक यंत्रणा अधिक सक्षम झाल्या असून भांडवल आणि मार्गदर्शन उपलब्धतेचा विस्तार झाला आहे. तसेच विविध क्षेत्रे आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये स्टार्टअप्सची वाढ आणि विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अभूतपूर्व विस्तार झाला असून देशभरात 2 लाखांपेक्षा अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. या उद्योगांनी रोजगारनिर्मिती, नवोन्मेष-आधारित आर्थिक विकास तसेच विविध क्षेत्रांतील देशांतर्गत मूल्यसाखळ्यांच्या बळकटीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पं. नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ‘स्टार्टअप इंडिया’च्या दशपूर्तीनिमित्त कार्यक्रमाला केले संबोधित
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement