Success Story : 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडली, रेशीम शेतीने नशीब पालटलं, वर्षाला 7 लाखांची कमाई
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पारंपरिक शेतीतून मर्यादित नफा मिळत असल्याचं पाहून त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला, आणि तोच निर्णय आज त्यांच्या यशाचं प्रमुख कारण ठरला आहे.
बीड जिल्ह्यातील गावंधरा येथील रामप्रभू बडे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर ग्रामीण भागात नवा आदर्श निर्माण केला आहे. एका कंपनीतील 30 हजार रुपयांची नोकरी सोडून त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये रेशीम उद्योग सुरू केला आणि आज त्याच उद्योगातून वर्षाला तब्बल सहा ते सात लाख रुपयांची कमाई करत आहेत. पारंपरिक शेतीतून मर्यादित नफा मिळत असल्याचं पाहून त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला, आणि तोच निर्णय आज त्यांच्या यशाचं प्रमुख कारण ठरला आहे.
advertisement
रामप्रभू बडे यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने रेशीम किडींच्या पालनासाठी शेड उभारलं आहे. सुरुवातीला त्यांनी शासकीय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतलं, ज्यामुळे त्यांना या उद्योगाचं सखोल ज्ञान मिळालं. त्यांनी शेतात तुतीची झाडं लावून किड्यांना आवश्यक आहाराची सोय केली. सुरुवातीला केवळ थोड्या प्रमाणात सुरू झालेला हा उद्योग आज त्यांच्या मुख्य उत्पन्नाचं साधन बनला आहे. त्यांच्या शेतात प्रत्येक बॅचमध्ये हजारो रेशीम किड्यांचं पालन केलं जातं आणि प्रत्येक बॅचमधून त्यांना चांगला नफा मिळतो.
advertisement
रेशीम उद्योगातील दोन्ही कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे रामप्रभू बडे यांना वर्षभर स्थिर उत्पन्न मिळतं. वर्षात दोन वेळा रेशीम किडींचं पालन करून ते उत्पादन घेतात. त्यामुळे त्यांना सतत रोजगार आणि उत्पन्नाची हमी मिळते. यासोबतच त्यांनी या व्यवसायासाठी आधुनिक उपकरणं वापरून उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आहे. बडे सांगतात, सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या, पण आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर आज मी स्वावलंबी झालो आहे.
advertisement
त्यांच्या या उद्योगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. गावातील अनेक तरुण पारंपरिक शेतीपलीकडे विचार करून रेशीम उद्योगात उतरण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे, या व्यवसायामुळे महिलांनाही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. रामप्रभू बडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिलांनी लघु स्तरावर रेशीम पालन सुरू केलं आहे.
advertisement
रामप्रभू बडे यांची कहाणी हे ग्रामीण स्वावलंबनाचं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिलं की, इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी असेल तर नोकरीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक लाभदायक पर्याय ठरू शकतो, आणि गावंधऱ्याचे रामप्रभू बडे यांनी या उद्योगातून शेतीतून उद्योग या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आहे.









