Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा जीवघेणी कोंडी; प्रवाशांचे अतोनात हाल
Last Updated:
Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा जीवघेणी वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वर्सोवा ब्रिज ते वसई फाटा दरम्यान तब्बल 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह व्यावसायिक वर्गाचे मोठे हाल झाले आहेत. वर्सोवा ब्रिजपासून वसई फाट्यापर्यंत तब्बल 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांची हालचाल अत्यंत संथगतीने होत असून अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक परिणाम वृत्तपत्र वितरण, दूध पुरवठा, फळभाजी विक्रेते आणि इतर छोट्या व्यावसायिकांवर झाला आहे. लवकर सकाळी माल पुरवठा करणाऱ्या वाहनांना वेळेत पोहोचता न आल्याने व्यापारिक हालचालींवर परिणाम झाला आहे. दूध गाड्या, वृत्तपत्र वितरण वाहने आणि बाजारात जाणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
advertisement
ठाणे रोडवरील गायमुख परिसरात सुरु असलेल्या दुरुस्ती आणि विकासकामांमुळे महामार्गावरील वाहतूक अधिकच विस्कळीत झाली आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकाम आणि बांधकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून वर्सोवा ते वसई फाटा या दरम्यान वाहनांच्या रांगा सतत वाढत आहेत.
advertisement
घोडबंदर परिसरात 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान अवजड वाहनांसाठी महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील अनेक अवजड वाहने महामार्गावरूनच प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. बंदीच्या काळानंतरही अवजड वाहनांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे.
advertisement
वाहतूक पोलिसांकडून महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी वाहतूक वळवण्याचे निर्णय घेण्यात आले असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सकाळपासून सायंकाळपर्यंत परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.
advertisement