Pune Traffic : गणपती विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
गणपती विर्जनसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, पोलिसांनी अनेक रस्ते बंद, काही रस्त्यांवर नो पार्किंग आणि पर्यायी पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे.
पुणे : पुण्यातील पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि.6) सकाळी 9 वाजता मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात सुरू होणार आहे. या मिरवणुकीत हजारो भाविक, मंडळे आणि विविध ढोल-ताशा पथकांचा सहभाग होतो. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, पोलिसांनी अनेक रस्ते बंद, काही रस्त्यांवर नो पार्किंग आणि पर्यायी पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबत आदेश दिले असून, नागरिकांनी या बदलांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद रस्ते
6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पासून मिरवणूक संपेपर्यंत काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यामध्ये राहुल गांधी चौकी, काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, तसेच लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक यांचा समावेश आहे.
सकाळी 9 पासून बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक) हे मार्ग बंद राहतील.
advertisement
सकाळी 10 नंतर दारूवाला पूल ते जिजामाता चौक आणि केळकर रस्ता, बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. दुपारी 12 नंतर बाजीराव रस्ता, सावरकर चौक ते फुटका बुरुज चौक, कुमठेकर रस्ता, टिळक चौक ते चितळे कॉर्नर, तसेच शास्त्री रस्ता, सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज चौक बंद केले जातील.
advertisement
सायंकाळी 4 पासून शहरातील प्रमुख मार्गांवर बंदी असेल. यात जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक), कर्वे रस्ता (नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक), फर्ग्युसन कॉलेज रस्ता (खंडोजी बाबा चौक ते कॉलेज मेनगेट), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते नटराज चौक), तसेच सातारा, सोलापूर आणि प्रभात रस्ता यांचा समावेश आहे.
advertisement
नो पार्किंग व्यवस्था
6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून खालील मार्गांवर नो पार्किंग लागू असेल: लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता.
पर्यायी पार्किंग
वाहनचालकांसाठी पर्यायी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दुचाकीसाठी पेशवे पार्क, सारसबाग, पाटील प्लाझा, दांडेकर पूल, गणेशमळा, निलयम टॉकीज, मराठवाडा कॉलेज येथे व्यवस्था आहे. दुचाकी व चारचाकींसाठी शिवाजी आखाडा, एआयएसएसपीएमएस मैदान, एसपी कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रस्ता मैदान, तसेच नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल उपलब्ध राहणार आहे.
advertisement
डायव्हर्जन पॉईंट्स
मिरवणुकीच्या काळात शहरात 10 प्रमुख ठिकाणी डायव्हर्जन पॉईंट्स ठेवण्यात आले आहेत. यात झाशीची राणी चौक, गाडगीळ पुतळा, दारूवाला पूल, संत कबीर चौकी, सेव्हन लव्हज चौक, व्होल्गा चौक, सावरकर चौक, सेनादत्त चौक, नळस्टॉप आणि गुडलक चौक यांचा समावेश आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊ शकते. मात्र, पोलिसांनी पर्यायी मार्ग, पार्किंग आणि डायव्हर्जनची प्रभावी योजना तयार केली आहे. नागरिकांनी वाहनं योग्य ठिकाणी पार्क करावीत, नियमांचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 04, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : गणपती विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?


