मोठी बातमी: फॉर्च्युनर कारने जात होता माजी मंत्र्याचा पुतण्या, मध्यरात्री बारामतीजवळ भीषण अपघात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गुरुवारी मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ माजी मंत्र्याच्या पुतण्याच्या फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झाला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी भिगवण : गुरुवारी मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. माजी मंत्र्याचा पुतण्या आपल्या काही सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर कारमधून जात होता. मध्यरात्री उशिरा बारामतीपासून जवळच असलेल्या भिगवणजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. यात कारचं मोठं नुकसान झालं आहे.
हा अपघात महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला झाला आहे. एका भरधाव कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा काही भाग चक्काचूर झाला आहे, मात्र सुदैवाने सावंत यात सुखरूप बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
advertisement
धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आटोपून आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) गाडीने परंड्याकडे येत होते. गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. मात्र या भीषण धडकेतून धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
या अपघातावर प्रतिक्रिया देताना धनंजय सावंत यांनी न्यूज १८ मराठीला सांगितलं की, "कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी आज या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये."
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 8:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मोठी बातमी: फॉर्च्युनर कारने जात होता माजी मंत्र्याचा पुतण्या, मध्यरात्री बारामतीजवळ भीषण अपघात









