Investment Tips : दिवाळीत गुंतवणूक करताय?आधी हे वाचा,तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Trading Investment Strategies : दिवाळीच्या काळात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ नफा मिळण्यावर लक्ष न देता दीर्घकालीन योजना तयार करावी आणि विविध क्षेत्रांत गुंतवणूक करावी. योग्य सल्ल्याने जोखीम कमी होते आणि आर्थिक सुरक्षितता वाढते.
पुणे : दिवाळीचा शुभ मुहूर्त म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते. या शुभ सत्रात अनेक गुंतवणूकदार बाजारात नवीन गुंतवणुकीची सुरुवात करतात. मात्र, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी कोणते शेअर्स विकत घ्यावेत हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. तज्ञांच्या मते, या दिवशी दीर्घकालीन दृष्टीकोनातून मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सर्वात योग्य ठरते.
शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणूकदार विनय नेर्लेकर यांनी सांगितले की, मुहूर्त ट्रेडिंग हा केवळ एक प्रतीकात्मक शुभारंभ असतो. यातून दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. एका दिवसाचा नफा न पाहता पुढील पाच ते दहा वर्षांचा दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करावी. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्र, डेटा मॅनेजमेंट, क्लाउड सर्व्हिसेस आणि ऑटोमेशनशी संबंधित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीची शक्यता आहे.
advertisement
कंपन्यांची आर्थिक स्थिती भक्कम असून त्यांच्याकडे मजबूत व्यवस्थापन आणि सातत्याने नफा कमावण्याची क्षमता आहे. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास बाजारातील चढउतारांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते.
याशिवाय सरकारच्या अलीकडच्या धोरणात्मक निर्णयांमुळे गुंतवणुकीसाठी आणखी संधी निर्माण झाल्या आहेत. वस्तू आणि सेवा कर दरात कपात आणि आयकर स्लॅब वाढल्याने बाजारात तरलता वाढली आहे. परिणामी कंझम्प्शन सेक्टर म्हणजेच ग्राहक वस्तू आणि सेवा क्षेत्र अधिक आकर्षक ठरले आहे. या क्षेत्रातील मागणी वर्षभर सातत्याने राहते, त्यामुळे त्यात गुंतवणुकीचा धोका तुलनेने कमी असतो.
advertisement
नेर्लेकर यांच्या मते, गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ विविध क्षेत्रांमध्ये विभागून ठेवावा. उदाहरणार्थ, जर एखाद्याकडे 1 लाख रुपयांची गुंतवणूक असेल, तर त्यातील 15 ते 20 टक्के रक्कम सोनं आणि चांदीत ठेवावी. त्याचप्रमाणे 20 टक्के म्युचल फंडमध्ये आणि 20 टक्के एआय-संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. उर्वरित रक्कम बँकिंग, एफएमसीजी आणि पॉवर क्षेत्रातील स्थिर कंपन्यांमध्ये विभागता येईल.
advertisement
गुंतवणूक तज्ञांचे मत आहे की, बँकेपेक्षा चांगले परतावे मिळवायचे असतील पण जोखीम कमी ठेवायची असेल, तर म्युचल फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, या फंडमध्ये गुंतवणुकीनंतर किमान पाच ते सात वर्षे संयमाने थांबावे लागते. या कालावधीत चक्रवाढ व्याजाचा परिणाम मोठा होतो आणि दीर्घकालीन रिटर्न्स समाधानकारक मिळतात.
एकूणच, मुहूर्त ट्रेडिंग हा केवळ शेअर खरेदी-विक्रीचा क्षण नसून आर्थिक नियोजनाचा शुभारंभ असतो. शुभ मुहूर्तावर घेतलेले शहाणपणाचे गुंतवणुकीचे निर्णय पुढील वर्षांमध्ये मोठे फळ देऊ शकतात, असा तज्ञांचा सल्ला आहे. (शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Investment Tips : दिवाळीत गुंतवणूक करताय?आधी हे वाचा,तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला