Bhama Askhed Water Project : पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न कायम; भामा-आसखेड योजनेचा नेमका तिढा काय?
Last Updated:
Pimpri Chinchwad Water Supply : पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक ठरणारी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी मिळेल की नाही हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच शहरातील लोकसंख्येत सतत वाढ होत असल्याने भामा-आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याचे महापालिकेचे काम संथ गतीने सुरू आहे. डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण होण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन आणि जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नियोजित मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
सध्या पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शहराच्या चारही बाजूंनी इमारतींचा विस्तार झाल्यामुळे लोकसंख्या 30 लाखांवर पोहोचली आहे. पवना आणि आंद्रा धरण तसेच एमआयडीसीचा पुरवठा आता अपुरा पडतो आहे. मागील सहा वर्षांपासून पाणी पुरवठा दिवसाआड केला जातो. लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे भामा-आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी आरक्षित केले आहे.
advertisement
या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीमधील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत 7.30 किलोमीटर अंतराची 1700 मिमी व्यासाची जलवाहिनी तयार केली जात आहे. त्यानंतर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 18.80 किलोमीटर अंतराची 1400 मिमी व्यासाची जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत फक्त 55 टक्के काम पूर्ण झाले असून जागा ताब्यात घेणे आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रगती मंदावलेली आहे.
advertisement
धरण शंभर टक्के भरले असल्याने अशुद्ध जलउपसा केंद्राच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. स्थापत्यकामे, यंत्रसामग्रीची जोडणी, पंपिंग स्टेशन आणि विद्युत जोडणी यासारखी कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या शहराला पाणीपुरवठा खालील प्रमाणे होतो:
पवना धरणातून 550 दशलक्ष लिटर, आंद्रा धरणातून 80 दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून 20 दशलक्ष लिटर, एकूण 650 दशलक्ष लिटर.
advertisement
महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून 2023 मध्ये मुळशी धरणातून 760 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. या मागणीसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांसोबत महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती तरीही अद्याप निर्णय झाला नाही.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले की, भामा-आसखेड योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. धरणाजवळील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि पंपिंग स्टेशनचे काम सुरू असून, जलवाहिनीत येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुदतीत काम पूर्ण होण्याची तयारी सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bhama Askhed Water Project : पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न कायम; भामा-आसखेड योजनेचा नेमका तिढा काय?