पुणे-सोलापूर महामार्गावरील नामांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांनीच पाठवलं गिऱ्हाईक, मग पुढं..
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर या बनावट ग्राहकाने मॅनेजर मोहन कसनू राठोड याच्याकडे शरीरविक्रयासाठी महिलेची मागणी केली. मॅनेजरने कोणतीही शंका न घेता पंचांसमक्ष या मागणीला संमती दिली
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांच्या वर्दळीचा फायदा घेत सुरू असलेल्या एका मोठ्या अनैतिक व्यवसायाचा लोणी काळभोर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या 'हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह' या नामांकित रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (१९ डिसेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास एक विशेष सापळा रचण्यात आला. पोलिसांनी या कारवाईसाठी एका बनावट ग्राहकाची नियुक्ती केली आणि त्याला पंचांसह हॉटेलमध्ये पाठवले.
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर या बनावट ग्राहकाने मॅनेजर मोहन कसनू राठोड याच्याकडे शरीरविक्रयासाठी महिलेची मागणी केली. मॅनेजरने कोणतीही शंका न घेता पंचांसमक्ष या मागणीला संमती दिली आणि वेटरच्या माध्यमातून महिलेची सोय करून देण्याचे कबूल केले. व्यवहार निश्चित होताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर मोहन कसनू राठोड (वय ५०) आणि वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय २५) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या छाप्यातून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सन्मानपूर्वक सुटका केली असून, त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
पुण्यासारख्या शहराच्या वेशीवर आणि वर्दळीच्या महामार्गावर अशा प्रकारचे लॉजिंग-बोर्डिंग व्यवसाय आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. हॉटेल मालकाचा या प्रकरणात सहभाग आहे का? तसेच हे रॅकेट किती काळापासून आणि कोणाकोणाच्या आशीर्वादाने सुरू होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कडक निर्बंध आणण्यासाठी महामार्गावरील सर्व लॉजिंगची तपासणी मोहिमेची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-सोलापूर महामार्गावरील नामांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांनीच पाठवलं गिऱ्हाईक, मग पुढं..










