PMAY: पंतप्रधान आवास योजनेत मोठा बदल! आता गरजूंना मिळणार हक्काचं आणि मोठं घर
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
PMAY: या योजनेमुळे बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. घरांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढेल, तसेच अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
पुणे: आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक कुटुंबांना आर्थिक मर्यादांमुळे हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पिंपरी-चिंचवडमधील अशा गरजू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना 2.0 च्या (पीएमएवाय) नव्या टप्प्यात घराच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली आहे, तसेच योजनेतील उत्पन्न मर्यादाही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या अनेक कुटुंबांना आता घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
झोपडपट्टीतील नागरिकांनाही हक्काचं घर
पंतप्रधान आवास योजना 2.0 मध्ये आता पात्र झोपडपट्टीवासीयांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने 'घर सबका' हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित 9 भूखंडांवर, तसेच एचडीएच अंतर्गत निश्चित भूखंडांवर हे गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत निवारा मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
advertisement
आता मिळणार अधिक मोठं आणि दर्जेदार घर
पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात फक्त 30 चौरस मीटर कार्पेट एरिया असलेल्या क्षेत्रफळाचं घर दिलं जात होतं. मात्र आता, हे क्षेत्र वाढवून 45 चौरस मीटर करण्यात आलं आहे. यामुळे लाभार्थ्यांना मिळणारं घर अधिक मोकळं, सुसज्ज आणि राहण्यायोग्य होणार आहे. केवळ आकारातच नव्हे, तर गृहप्रकल्पांच्या गुणवत्तेमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.
advertisement
शहरात नऊ ठिकाणी प्रकल्प
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात नऊ ठिकाणी भूखंड राखीव ठेवले आहेत. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. चाऱ्होळी, आकुर्डी, बोऱ्हाडेवाडी आणि पिंपरी येथील प्रकल्प आधीच पूर्ण झाले आहेत. सध्या डुडूळगाव येथे बांधकाम सुरू आहे. रावेतमधील प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. पण, त्या लाभार्थ्यांना किवळे येथे घरं दिली जात आहेत.
advertisement
उत्पन्न मर्यादा सहा लाख
पूर्वी फक्त तीन लाखरुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबं योजनेसाठी अपात्र ठरत होती. आता ही मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तीन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
'ही योजना केवळ घर देणारी नाही, तर अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे,' असं मत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, "क्षेत्रफळात वाढ, उत्पन्न मर्यादेतील बदल आणि घरांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा यामुळे हजारो पिंपरी-चिंचवडकरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे."
advertisement
या योजनेमुळे बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. घरांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढेल, तसेच अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 05, 2025 10:37 AM IST









