Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांची 'होळी' वाहतूक कोंडीत! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासाआधी पाहा काय आहे परिस्थिती
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो खासगी वाहने आणि एसटी बसेस मुंबईतून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आज सकाळपासूनच माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर परिसरात वाहनांचा वेग मंदावला आहे.
(मोहन जाधव, प्रतिनिधी) रायगड: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अलोट गर्दी झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार, रविवार आणि त्यानंतर येणारी धुळवड अशा 'लाँग विकेण्ड'मुळे मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गावाची वाट धरली आहे. याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला असून माणगाव आणि इंदापूर शहरांत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.
होळी हा कोकणातील मोठा आणि जिव्हाळ्याचा सण. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो खासगी वाहने आणि एसटी बसेस मुंबईतून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आज सकाळपासूनच माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर परिसरात वाहनांचा वेग मंदावला आहे. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनसंख्या यामुळे प्रवाशांना तासनतास एकाच जागी थांबून राहावे लागत आहे.
advertisement
आज शनिवार असल्यामुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. हीच परिस्थिती पुढील तीन दिवस म्हणजे धुळवडीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. होळीच्या उत्सवासाठी निघणाऱ्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. महत्त्वाच्या नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवून लहान वाहनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, वाहनांचा ओघ पाहता प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 1:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांची 'होळी' वाहतूक कोंडीत! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासाआधी पाहा काय आहे परिस्थिती










