पोरांच्या नशिबात येणार भयंकर सिंगलपणा, पुण्यातून धक्कादायक वास्तव समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मागील काही काळापासून ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही काळापासून ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. देशातील वाढती बेरोजगारी, सततचा दुष्काळ, शेतीत न मिळणारं उत्पन्न अशा विविध कारणांमुळे गावातील पोरांना लग्नासाठी पोरी मिळणं कठीण झालं आहे. अनेकदा मुली देखील शहरात जाऊन राहणं पसंत करत आहेत. पण शहरी भागात देखील बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे शहरातील मुलांमध्ये देखील सिंगलपणा वाढला आहे.
अशात आता पुण्यातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हातात नोकरी नसल्याने आधीच मुलांना लग्नासाठी प्रचंड झगडावं लागत आहे. आता त्यांचा सिंगलपणा आणखी वाढणार आहे. कारण पुण्यात हजार मुलांमागे फक्त ९११ मुलींचा जन्म होत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातायत. यासाठी अनेक योजना, मोहिमा राबवल्या जातायत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. तरीही मुलींचा जन्मदर घटत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१२-१४ मध्ये एक हजार मुलांमागे ९३४ ते ९४० मुली जन्माला येत होत्या. मात्र आता हा आकडा घटून ९११ वर पोहोचला आहे.
advertisement
२०२० मध्ये हा दर ९४६ पर्यंत पोहोचला होता. मात्र २०२१ ते २०२४ दरम्यान हजार मुलांमागे केवळ ९११ मुली जन्मल्या असल्याची माहिती, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. हा आकडा चिंतेचा असून, २०२० नंतर जन्मदरात झालेली घट नेमकी का झाली? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गर्भलिंग निदान चाचण्यांवर अजूनही प्रभावी नियंत्रण नसल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 28, 2025 10:58 AM IST