भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग मंदिर 3 महिने बंद, ‘त्या’ 125 कुटुंबांबाबत मोठा निर्णय, काय घडतंय?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bhimashankar Temple: आगामी कुंभमेळा 2027 दरम्यान भीमाशंकर येथे दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी मोठी योजना राबविण्यात येत आहे. मंदिर परिसरातील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या 125 कुटुंबांचे पुनर्वसन करून 10.5 एकर जागेत नवे नियोजित गाव उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ग्रामस्थांसमोर ठेवला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 174 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या मंदिराच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामासाठी मंदिर तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. आगामी कुंभमेळा 2027 दरम्यान दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने मंदिर परिसरातील वाहतूक आणि प्रवेश व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे.
advertisement
मंदिराच्या प्रवेशमार्गावर सध्या सुमारे 110 घरे असल्यामुळे भाविकांच्या ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे मंदिरापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर नव्या ठिकाणी या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांची बैठक गुढीपाडव्याच्या दिवशी घेण्यात येणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या नव्या गावाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण जागेच्या 20 टक्के भागात ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 35 टक्के जागेत स्थलांतरित कुटुंबांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत.
advertisement
तिसऱ्या टप्प्यात 15 टक्के जागेत 40 ते 50 हेरिटेज स्वरूपाची दुकाने तसेच मोकळी जागा विकसित केली जाणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. चौथ्या टप्प्यात उर्वरित 30 टक्के जागेत 9 मीटर रुंदीचा रस्ता, वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यासाठी संरक्षक भिंत आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी सुलभ व्यवस्था आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामस्थांच्या संमतीनंतर या नव्या गावाच्या उभारणीच्या कामाला वेग देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 1:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग मंदिर 3 महिने बंद, ‘त्या’ 125 कुटुंबांबाबत मोठा निर्णय, काय घडतंय?








