नवरा-नवरी तयार, वऱ्हाडीही जमले, पण विवाह नोंदणी अधिकाऱ्याची ती अट, अन् सगळ्यांनाच फुटला घाम! शेवटी..
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: पुण्यात कायद्याचा कसा वापर होईल अन् सर्वसामान्यांचा गोंधळ कसा उडेल याचा नेम नाही. विवाह नोंदणी कार्यालयात असाच काहीसा प्रकार घडला असून नवरा-नवरीची चांगलीच धावपळ झाली.
पुणे : साधेपणावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या कल्पना आणि अरुण (नावे बदललेली) या तरुण दाम्पत्याला नोंदणी पद्धतीने विवाह करायचा होता. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी नियमानुसार नोंदणी कार्यालयात अर्जही सादर केला होता. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर कार्यालयाकडून 30 दिवसांनंतरची तारीख देण्यात आली. त्यानुसार कुटुंबीयांनी स्वागत समारंभाची तयारी केली. मात्र त्या दिवशीच एक अनपेक्षित अडथळ्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांची धावपळ उडाली.
ठरलेल्या दिवशी वधू-वर आणि नातेवाईक नोंदणी कार्यालयात पोहोचले. तिथे संबंधित अधिकाऱ्याने मुलाकडून शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट) मागितली. मुलाने दाखवले की त्याने आवश्यक कागदपत्रे अर्ज करतानाच दिली होती आणि वयाचा पुरावा म्हणून कॉलेज सर्टिफिकेटसह अनेक दाखले आधीच छाननीसाठी देण्यात आले होते. मात्र संबंधित अधिकारी मूळ प्रमाणपत्राशिवाय विवाह नोंदणी करण्यास नकार देत ठाम राहिले.
advertisement
लग्नच नाहीतर स्वागत कसले?
फलटण येथील रहिवासी असलेल्या मुलाची बहुतेक कागदपत्रे गावाकडे असल्याने तत्काळ मूळ दस्तऐवज मिळवणे कठीण होते. स्वागत समारंभासाठी सभागृह आरक्षित, निमंत्रणे वाटलेली आणि नातेवाईक पुण्याकडे निघालेले. अशा स्थितीत कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. लग्नच झाले नाही तर स्वागत कसले? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
advertisement
...अखेर विवाह नोंदणी झाली
या गोंधळात दोघांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्याशी बोलण्याची तयारी दर्शवली. पण त्याची गरज पडली नाही. नोंदणीसाठी अर्ज करताना मुलाने आणलेल्या कागदपत्रांची पिशवी घरी तपासण्याचे सुचल्यावर त्याने ती तपासली आणि सुदैवाने मूळ ‘स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट’ मिळाले. तातडीने ते कार्यालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अधिकारी संतुष्ट झाले आणि अखेर विवाहाची नोंदणी करण्यात आली.
advertisement
कोण काय म्हणालं?
view commentsया प्रकरणाबाबत सह-नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे म्हणाले, प्रकरण कोणतेही असो, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. काही अधिकारी कागदपत्रांच्या बाबतीत कडक भूमिका घेतात. त्यात त्यांची चूक नाही. तर सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांचे मत वेगळे होते. साध्या प्रकरणात थोडी लवचिकता दाखवली असती तर एवढी धावपळ झाली नसती. अनेक वेळा कार्यालयीन कामकाजात नियमांचे अर्थ लावण्यात फरक पडतो, असे ते म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
नवरा-नवरी तयार, वऱ्हाडीही जमले, पण विवाह नोंदणी अधिकाऱ्याची ती अट, अन् सगळ्यांनाच फुटला घाम! शेवटी..


